कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते,बेफिकीरीने वागू नका,शिस्त पाळा -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला आवाहन

मास्क वापरणे, हात धुणे आणि शारीरिक अंतर ठेवणे या शिस्तीचे पालन करावे

प्रदुषण आणि गर्दी टाळून सण साधेपणाने साजरा करा

उद्योगक्षेत्रातील गुंतवणूकीत महाराष्ट्राची मोठी झेप

मुंबई दि,८ : जगभरात येत असलेली  कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल हे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदुषण आणि गर्दी टाळून तो साधेपणाने आणि आनंदाने साजरा करावा, सुख समृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दारातून कोरोनाला आत येऊ देऊ नये असे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी  फटाक्यांवर बंदी घालून आपल्यावर आणीबाणी लादायची नसून परस्पर विश्वासातून आपल्याला पुढे जायचे आहे असेही म्हटले आहे. मुख्यमंत्री  श्री. उद्धव ठाकरे यांनी  समाजमाध्यमाद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला.

           बेफिकीरीने वागू नका

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोरोना संकटकाळात राज्यातील सर्वधर्मियांनी त्यांचे सण साधेपणाने साजरे करून शासनाला सहकार्य केले आहे. इथून पुढेही हे सहकार्य आवश्यक आहे. धूर आणि प्रदुषणामुळे कोरोना नियंत्रणासाठी आतापर्यंत आपण केलेले प्रयत्न आणि त्याला प्राप्त झालेले थोडे यश हे बेफिकीरीने वागून  वाहून जाऊ शकते याकडे राज्यातील जनतेचे त्यांनी  लक्ष वेधले.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला प्रकाशपर्व दिपावलीच्या शुभेच्छाही दिल्या.

दिवाळीनंतरचे दिवस हे हिवाळ्याचे दिवस असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की इटली, स्पेन,इंग्लंड, नेदरलँड सारख्या देशात कोरोनाची दुसरी जबरदस्त लाट आलेली दिसून येत आहे.काही ठिकाणी पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे.

दुसऱ्या टप्प्यात हा विषाणु दुप्पट वेगाने वाढतो आहे. आपल्याला भारतात आणि महाराष्ट्रात ही दुसरी लाट येऊच द्यायची नाही त्यामुळे शिस्तीचे पालन आवश्यक आहे. कोरोनाशी लढतांना आपण राज्यभर जम्बो आरोग्य सुविधा उभ्या करत आहोत,  आपले डॉक्टर, नर्सेस आणि इतर कोविड योद्धे ही आपल्यासाठी गेली कित्येक महिने अथक परिश्रम घेत आहेत.

   उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप

कोरोनाशी कडवा मुकाबला सुरु असतांना महाराष्ट्राने अनलॉक काळात उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले, पहिल्या टप्प्यात 17 हजार तर दुसऱ्या टप्प्यात  35 हजार कोटी रुपयांची  गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याची माहिती त्यांनी  दिली. महाराष्ट्रात गुंतवणूक केलेल्या उद्योजकांना आवश्यक असलेल्या जमीन आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. कोरोना काळात महाराष्ट्रात करण्यात आलेल्या उपाययोजना, राज्यातील जनतेचे सहकार्य आणि महाराष्ट्राची एकूण प्रतिमा याचे हे फलित असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मेट्रो मार्गिकेसाठी माफक व्याजदरात कर्ज

मुंबई- ठाणे प्रवास गतिमान होण्यासाठी मेट्रो मार्गिकेसाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यू विकास बँकेकडून 45 दशलक्ष युरोचे कर्ज माफक व्याजदरात घेण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी महाराष्ट्रात गुंतवणूक करतांना खुप आश्वासक वाटत असल्याची प्रतिक्रिया गुंतवणूकदार देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले.

41 लाख हेक्टरचे पूर अतिवृष्टीने नुकसान,10 हजार कोटी रुपयांची मदत

लोकांचा पैसा लोकहितासाठी वापरला जात असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी जून ते ऑक्टोबर 2020 या काळात 41 लाख हेक्टर जमीन अतिवृष्टी, पुराने बाधित झाल्याचे सांगितले. यात मोठ्याप्रमाणात शेतपिकांचे नुकसान होतांना घरे पडली, जमीनी वाहून गेल्या. यासर्वांना मदत करण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

माझे कुटुंब -माझे जबाबदारी अभियानाला मोठे यश

कोरोना नियंत्रणात शासनासोबत राज्यातील जनतेला सहभागी करून घेण्यासाठी  ‘ माझे कुटुंब-माझी जबाबदारी ’  हे अभियान राबविण्यात आले.  यात 60 हजार टीम सहभागी होऊन त्यांनी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.ते म्हणाले की या तपासणीमध्ये साडे तीन लाख आयएलआय व सारीचे रुग्ण आढळले. 13 लाख लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे जाणवले तर 8 लाख 69 हजार 370 लोकांना मधुमेह असल्याचे लक्षात आले. 73 हजार लोकांना ह्दयरोग तर 18843 लोकांना कर्करोग असल्याची माहिती यातून मिळाली. 1 लाख 6 हजाराहून अधिक लोकांना इतर आजार असल्याचे दिसून आले. या अभियानात 51 हजारापेक्षा अधिक लोकांना कोरोना झाल्याचे लक्षात आले. घरोघर जाऊन राज्यातील लोकांची आरोग्य तपासणी केल्यामुळे राज्याचा आरोग्यविषयक नकाशा यातून स्पष्ट झाला.

वेळेत कोरोना रुग्णांचे निदान झाल्याने त्यांच्यावर उपचार करणे शक्य झाल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ अभियानात सहभागी होऊन काम करणाऱ्या सर्व यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले व महाराष्ट्र तुमचा ऋणी असल्याची भावना व्यक्त केली       

मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई

मास्क न वापरणे ही गोष्ट अजिबात चालवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की एक कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण 400 जणांना बाधित करू शकतो.ते चारशे जण किती जणांना बाधित करतील याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांच्या विरुद्ध  कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचेही  त्यांनी सांगितले.

आलेख घटता पण काळजी घेण्याची गरज

दिवाळीनंतर मंदिरे,प्रार्थनास्थळे उघडण्या बाबत नियमावली तयार करून निर्णय घेऊ हेही  मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.कोरोना रुग्णांचे प्रमाण आणि आलेख घटता दिसत असला तरी अद्याप काळजी घेण्याची, ज्येष्ठांना जपण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या हितासाठी माझ्यावर टीका झाली तरी चालेल परंतु मी माझ्या महाराष्ट्राचे आणि माझ्या जनतेचे हित जपणारच ही ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र हितासाठी काम करणार

मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी थांबवण्याचे आवाहन करून मुख्यमंत्र्यांनी आरे कारशेड प्रकरणी होणाऱ्या टीकेला योग्य वेळी उत्तर देऊ असे म्हटले तसेच मुंबईकरांच्या हितासाठी सुविधांची उभारणी करताना त्यात कुणीही मीठाचा खडा टाकू नये असे आवाहन त्यांनी  केले.

            सावधपणे पाऊल पुढे

मुख्यमंत्र्यांनी अनलॉक प्रक्रियेमध्ये राज्यात आपण सावधतेने पाऊल पुढे टाकत असल्याचे सांगतांना नियमावली निश्चित करून आतापर्यंत रेस्टॉरंट, नाट्य आणि सिनेमागृहे व्यायामशाळा, ग्रंथालये आदी बाबींना मान्यता दिल्याची माहिती दिली.  दिवाळीनंतर नियमावलीच्या आधारे  9 वी ते 12 वी वर्गाच्या शाळा सुरु करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महिलांसाठी लोकल प्रवासाला मान्यता देण्यात आली असून सर्वांसाठी लोकलची मान्यता देण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारबरोबर चर्चा सुरु असून रेल्वेमंत्री पियुष गोयल चांगले सहकार्य करत असल्याचेही ते म्हणाले

            धान्य खरेदी केंद्रे सुरु

मुख्यमंत्र्यांनी राज्यात कापूस खरेदी केंद्रे सुरु झाल्याचे सांगतांना उडीद, मुग, सोयाबीन, तूर यासारख्या इतर शेतपिकांची शासन खरेदी  करणार असून  येत्या महिनाभरात ही केंद्र  सुरु करण्यात येतील अशी माहिती यावेळी दिली.

             हे सरकार तुमचेच

फोर्सवन मधील सैनिकांना प्रोत्साहनभत्ता दिल्याचे, माजी सैनिकांसाठी निवासी मालमत्ता कर (घरपट्टी) माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. समाजातील कोणताच घटक वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी मराठा, धनगर तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भात भाष्य  केले. हे सरकार तुमचेच असून तुमच्या हक्काच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचा  त्यांनी पुनरुच्चार केला.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट