केएफडब्ल्यु विकास बँकेच्या कर्ज करारावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी
मुंबई-ठाणे प्रवास गतिमान करणारा मेट्रो मार्गिका 4 प्रकल्प वेळेत पूर्ण होईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- by Adarsh Maharashtra
- Nov 07, 2020
- 772 views
मुंबई, दि. ६ : मुंबईकरां सोबतच ठाणे करांचाही दैनंदिन प्रवास आरामदायी आणि गतिमान होण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मेट्रो मार्गिका ४ आणि ४ अ प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, अशी ग्वाही देतानाच मुंबई महानगर परसिरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत हा प्रकल्प आमुलाग्र बदल घडवेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुंबई मेट्रो मार्गिका ४ व ४ अ या प्रकल्पा साठी जर्मनीच्या केएफडब्ल्यु विकास बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्ज करारावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव आणि जर्मनीचे मुंबईतील वाणिज्यदूत जे. मोहार्ड यांनी करारावर स्वाक्षरी केली.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आजचा दिवस महत्वाचा आहे. मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुसह्य होण्यासाठी मेट्रोच्या प्रकल्पांना गती दिली जात आहे. मेट्रो मार्गिका ४ आणि ४ अ साठी केएफडब्ल्यू संस्थेने मंजूर केलेले भारतातील सर्वात जास्त रक्कमेचे कर्ज आहे. सुमारे दोन लाख प्रवासी दररोज ठाणे मुंबई प्रवास करतात. पुढील काही वर्षात मुंबईतील सार्वजनिक दळण-वळण व्यवस्थेत आमुलाग्र बदल होणार असून त्यामुळे मुंबईकरांचं गतिमान प्रवासाचं स्वप्न साकार होणार असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.
नगरविकास मंत्री श्री. शिंदे म्हणाले, केएफडब्ल्यू संस्था महाराष्ट्रासोबत पहिल्यांदा करार करीत आहे. हा प्रकल्प मुंबई महानगरातील प्रवाशांसाठी वरदान ठरणार असून या प्रकल्पामुळे मुंबई आणि ठाणे हे दोन महानगरे जोडली आहेत. कोरोना काळात जम्बो उपचाराच्या सुविधांच्या उभारणीत एमएमआरडीएने महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल श्री. शिंदे यांनी कौतुक केले.
यावेळी श्री. राजीव यांनी प्रास्ताविक करताना प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपरमुख्य सचिव आशीषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, ‘एमएमआरडीए’चे अतिरीक्त महानगर आयुक्त डॉ. गोविंदराज आदी उपस्थित होते.
मुंबई मेट्रो मार्गिका ४ प्रकल्पाचे वैशिष्ट्ये :
केएफडब्ल्यु विकास बँकेकडून घेण्यात येणा-या मुंबई मेट्रो मार्गिका ४ व ४- अ या प्रकल्पासाठी कर्ज करार.
४५ दशलक्ष युरो कर्ज हे KFW या संस्थेने मंजूर केलेले भारतातील सर्वात जास्त रक्कमेचे कर्ज आहे.
भारतातील इतर प्रकल्पाकरीता दिलेल्या कर्जपुरवठयापैकी हे कर्ज सर्वात कमी व्याजदराचे आहे.
मुंबई मेट्रो मार्गिका ४ - वडाळा-कासार-वडवली आणि मार्गिका ४-अ कासारवडवली ते गायमुख ह्या मेट्रो मार्गीकांच्या अंमलबजावणीकरीता केएफडब्ल्यू या जर्मन विकास बँकेकडून एकूण ५४५ दशलक्ष युरो इतक्या रक्कमेचे कर्ज इंडो जर्मन विकास सहाय्य अंतर्गत मंजूर.केएफडब्ल्यु जर्मन सरकारची विकास बँक.केएफडब्ल्यु विकास बँक सरकारी प्रकल्प, व्यापारी बँका आणि सार्वजनिक संस्थांना वित्तीय सहाय्य देते.
कर्ज तीन भागामध्ये मंजूर.
१) ३४५ दशलक्ष युरो इतकी रक्कम विकास कर्ज (Official Development Assistance) / कमी व्याज दरकर्ज (Reduce Interest Loan) म्हणून मंजूर. कर्ज २ भागामध्ये वितरीत होणार. भाग १ - २५५ दशलक्ष युरो हे रोलिंग स्टॉक आणि स्वयंचलित भाडे प्रणालीच्या उभारणीसाठी. तसेच भाग २ - ९० दशलक्ष युरो निधी बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरणाकरीता (Multimodal Integration) उपलब्ध होणार आहे.
२) २०० दशलक्ष युरो इतकी रक्कम अतिरिक्त विकास सहाय्य कर्ज (official Development Assistance Plus) हे इतर रेल्वे प्रणालीकरीता उपलब्ध होणार आहे.
३) २.२ दशलक्ष युरो हे परिचालन व परिरक्षण संस्था कार्यान्वित करण्याकरीता अनुदान म्हणून उपलब्ध होणार आहे.
कर्जाचे मुख्य वैशिष्ट पुढीलप्रमाणे आहेत.
अ. ५४५ दशलक्ष युरो कर्ज हे KFW या संस्थेने मंजूर केलेले भारतातील सर्वात जास्त रक्कमेचे कर्ज आहे.
ब. प्राधिकरणाने वाटाघाटी करुन विकास कर्ज (Official Development Assistance) भाग १ करीता ०.२९% आणि भाग २ करीता ०.०७% इतका व्याजदर निश्चित. २०० दशलक्ष यूरोकरीता ०.८२% इतका व्याजदर निश्चित.
भारतातील इतर प्रकल्पाकरीता दिलेल्या कर्जपुरवठयापैकी हे कर्ज सर्वात कमी व्याजदराचे आहे.
याकरीता त्रिपक्षीय कर्ज करार - भारत सरकार आणि केएफडब्ल्यू विकास बँक व प्रकल्प करार यांच्या दरम्यान. तसेच केएफडब्ल्यु विकास बँक, महाराष्ट्र शासन आणि एमएमआरडीए यांच्या दरम्यान आणि स्वतंत्र द्विपक्षीय करार हा केएफडब्ल्यु विकास बँक आणि एमएमआरडीए यांच्यात करण्यात येणार आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम