मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीची 'द्विशतकपूर्ती
४ विभागात ३०० पेक्षा अधिक तर ११ विभागात २०० पेक्षा अधिक दिवसांचा रुग्ण दुप्पटीचा कालावधी रुग्ण वाढीचा सरासरी दर देखील आता ०.३३ टक्क्यांपर्यंत खाली
- by Adarsh Maharashtra
- Nov 06, 2020
- 581 views
मुंबई दि,६ : मुंबई महापालिका क्षेत्रातील ‘कोविड – १९’ बाधित रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याच्या सरासरी कालावधीने आता द्विशतक गाठले आहे. यातही ठळक वैशिष्ट्य म्हणजे महापालिका क्षेत्रातील २४ विभागांपैकी ४ विभागांमध्ये ३०० पेक्षा अधिक दिवसांचा तर ११ विभागांनी २०० पेक्षा अधिक दिवसांचा रुग्ण दुप्पटीचा कालावधी गाठला आहे. एवढेच नव्हे तर रुग्ण वाढीचा साप्ताहिक सरासरी दर देखील आता घसरुन ०.३३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी जितका जास्त तितका संक्रमणाचा वेग कमी असतो. ही बाब लक्षात घेता, महापालिकेने दिनांक २१ ऑक्टोबर रोजी रुग्ण दुप्पटीचे शतक गाठले होते. तर दिनांक २९ ऑक्टोबर २०२० रोजी १५७ दिवसांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर अवघ्या ८ दिवसांत म्हणजे दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी मुंबईचा रुग्ण दुप्पटीचा सरासरी कालावधी ५१ दिवसांनी वाढून २०८ दिवस इतका झाला आहे.
महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांचा विचार करता, रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीमध्ये ४ विभागांनी ३०० दिवसांचा टप्पा गाठला आहे. यामध्ये ‘जी-उत्तर’ ३५१ दिवस, ‘एफ-दक्षिण’ ३१६ दिवस, ‘ए’ विभाग ३०८ दिवस आणि ‘सी’ विभाग ३०६ दिवस यांचा समावेश आहे.
तसेच, एकूण ११ विभागांनी २०० दिवसां पेक्षा जास्त रुग्ण दुप्पटीचा कालावधी गाठला आहे. त्यात ‘जी-दक्षिण’ विभाग २८३, ‘एल’ विभाग २४५, ‘ई’ विभाग २४२, ‘एस’ विभाग २३८, ‘डी’ विभाग २३३ दिवस, ‘एफ-उत्तर’ विभाग २१३ दिवस, ‘एम-पूर्व’ विभाग २०७ दिवस, ‘के-पूर्व’ विभाग २०७ दिवस, ‘एच-पश्चिम’ विभाग २०६ दिवस, ‘एच-पूर्व’ विभाग २०३ दिवस आणि ‘के-पश्चिम’ विभाग २०० दिवस यांचा समावेश आहे.
उर्वरित ९ विभागांमध्ये देखील रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा १५० दिवसांपेक्षा जास्तच आहे.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असताना रुग्णसंख्या वाढीमध्ये देखील लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढीचा साप्ताहिक दर जितका कमी तेवढे संसर्गावर नियंत्रण अधिक मानले जाते. हे पाहता, २९ ऑक्टोबर २०२० रोजी असलेला ०.४४ टक्के इतका रुग्ण वाढीचा सरासरी दर आता ०.३३% इतका झाला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम