
अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोठडीसाठी पोलिसांनी केले १५ युक्तीवाद
- by Adarsh Maharashtra
- Nov 04, 2020
- 1713 views
अलिबाग : गोस्वामी यांच्यासह इतर २ आरोपींना सुद्धा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फोरोज शेख आणि नितेश सारडा अशी इतर दोन आरोपींची नावं आहेत.
दरम्यान तिनही आरोपींनी त्यांना जामीन मिळावा यासाठी कोर्टात अर्ज केला आहे. त्यावर आपलं म्हणण मांडण्यासाठी कोर्टानं पोलिसांना वेळ दिलेला आहे. पण, कोर्टानं जामीन अर्जावरील सुनावणीसाठी निश्चित तारीख दिलेली नाही, आरोपींचे वकील सुशील पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
'अ समरी' रिपोर्ट मान्य झाल्यावर पुन्हा केसचा तपास करण्यासाठी न्यायालयाची मंजुरी घेतली नाही, पोलिसांवर असा ठपका ठेवत कोर्टानं पोलिसांना अर्णब गोस्वामी यांची पोलीस कोठडी नाकारली आहे.
अन्वय नाईक आणि त्यांच्या आईचा मृत्यू या घटनेशी आरोपींचा थेट संबंध प्रस्तापित व्हायला हवा, तो पोलिसांना करता आला नाही. तसंच आरोपींची पोलीस कोठडी घेण्यासाठी सबळ पुराव्याची गरज आहे, असं म्हणत कोर्टानं पोलिसांना कोठडी देण्यास नकार दिला आहे.
अर्णब गोस्वामी यांना नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना अलीबागच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
दरम्यान बुधवारी (४ नोव्हेंबर) सकाळी अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या सरकारी कामात अडथळा घातल्याप्रकरणी त्यांच्यावर ३५३ कलमांतर्गत आणखी एक FIR दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेताना धक्काबुक्की केली असं अर्णब गोस्वामींने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांच्या कोठडीची मागणी केली होती. त्यासाठी सरकारी वकिलांनी कोर्टात 15 वेगवेगळे युक्तीवाद केले होते.
सरकारी वकिलांचे १५ युक्तीवाद
- अर्णब गोस्वामी एका प्रस्थापित न्यूज चॅनलचे संपादक असून त्यांचा सामान्यांवर प्रभाव आहे.
- अन्वय नाईक यांची स्युसाईड नोट मृत्यूपूर्वीची जबानी म्हणून ग्राह्य धरण्यात आली आहे. आरोपींच्या कंपन्यांच्या मालकी/भागिदारीची कागदपत्र प्राप्त करून घ्यायची आहेत.
- नाईक यांच्या कंपनीतील साक्षीदारांचा तपास करायचा आहे. त्यावेळी अर्णव पोलीस कोठडीत असणे गरजेचं आहे. नाहीतर साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो.
- या गुन्ह्यांत नव्याने तपासामध्ये सकारात्मक माहिती मिळाली आहे. त्याचा तपास करायचा आहे.
- यापूर्वी केलेल्या तपासात कोणत्या वेंडर्सकडून कामं आरोपींनी पूर्वा करून घेतली याची माहिती नाही. त्यामुळे या वेंडर्सचा तपास करायचा आहे. त्यांना अटक करायची आहे.
- काम केल्याची कागदपत्र जप्त करायची आहेत.
- वर्क ऑर्डरपेक्षा जास्त काम केल्याचं साक्षीदीरांचं म्हणणं आहे. याचा तपास करायचा आहे.
- अन्वय नाईक यांनी वेळेत काम पूर्ण केले नाही, असा आरोपींचा दावा आहे. त्याची कागदपत्र जप्त करायची आहेत.
- नवीन तपासात काही कंपन्यांचे बॅंक अकाउंट नंबर मिळाले आहेत. त्यात आणखी काही अकाउंट आहे का, याची माहिती गोळा करायची आहे.
- काही साक्षीदारांचे १६४ CRPC अंतर्गत जबाब नोंदवायचे आहेत. त्यासाठी गोस्वामी यांना पोलीस कोठडी गरजेची आहे.
- आरोपींकडून सादर करण्यात आलेली कागदपत्र बनावट आहेत का, याचा तपास बाकी आहे.
- आरोपींनी सादर केलेल्या डेबिट नोटवर मयत यांची किंवा त्यांच्या कंपनीची सही असल्याचा पुरावा नाही. त्यामुळे या एकतर्फी जारी करण्यात आल्या आहेत. याचा तपास पोलीस कोठडीत करायचा आहे.
- वादग्रस्त रक्कमेचा प्रश्न सोडवण्यासाठी आरोपी यांच्याकडून ठोस प्रयत्न नाहीत. त्यामुळे मयत मानसिक दडपणाखाली होते अशी साक्षीदारांकडून माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मयत व्यक्तीस आत्महत्या करण्यायोग्य परिस्थिती निर्माण केली आणि परिणामी मयत यांनी गळफास लावून आत्महत्या केली. याचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडी गरजेची आहे.
- मयत यांच्या मुलीला पैसे स्वीकारावे आणि तक्रारी बंद कराव्यात यासाठी धमक्या देण्यात आल्या. त्यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी गोस्वामी यांना नोटीस बजावलेली आहे.
- तत्कालीन तपास अधिकाऱ्यांकडून तपासामध्ये अनेक उणीवा. फौजदारी प्रक्रिया संहितेचे उल्लंघन याकारणासाठी "अ समरी" अहवालावर फिर्यादीने आक्षेप घेतला होता. त्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचं तपासात आढळून आलं आहे.
काय घडलं कोर्टात
आरोपीने अटक करताना सहाय्य केलं नाही, असं रायगड पोलिसांनी कोर्टात सांगितलं. तसंच बनावट डेबिट नोट तयार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
तसंच पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांच्या वकिलांनी कोर्टात केला. तसंच ही चौकशी अवैध असल्याचा दावासुद्धा गोस्वामी यांच्या वकिलांनी केला.
त्यावर आरोपीने पोलिसांवर केलेल्या मारहाणीच्या आरोपांची तक्रार मी विचाराधीन घेत नाही. आरोपीने पोलिसांवर केलेले आरोप चुकीचे आहेत, असं कोर्टानं म्हटलं.
१५ ऑक्टोबर २०२० पासून नव्याने तपास
रायगड पोलिसांनी या प्रकरणी १५ ऑक्टोबरपासून नव्याने तपास सुरू केला आहे. त्यात त्यांनी फिर्यादी अक्षता नाईक यांचा जबाब नोंदवला आहे. तसंच नाईक यांच्या कंपनीचा महत्त्वाचा वेंडर असलेल्या व्यक्तिचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २८ साक्षीदारांना तपासासाठी नोटीस पाठवली आहे. यापूर्वी केलेल्या तपासातील काही साक्षीदारांनीही नवी माहिती दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.
त्यांच्याकडून मिळालेली माहिती सकारात्मक असल्याचं पोलिसांचं म्हणण आहे.
नाईक यांच्या लॅपटॉपमधील फाईल्सची तपासणी सुरू असून त्यात १ लाख पेक्षा जास्त फाईल्स असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच त्यांच्या आणि आरोपींच्या बॅंक खात्यांचीही चौकशी सुरू आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम