मोकळ्या जागेवर पालिकेतर्फेच बनवले जात आहे डम्पिंग ग्राउंड?

मुलुंड:(शेखर भोसले) मुलुंड पूर्वेतील मिठागर रोड येथील गणेश घाटा जवळील पालिकेच्या मोकळ्या जागेत सध्या पालिकेकडूनच कचरा टाकला जात असल्याचे आढळून आले आहे. मुलुंडमध्ये भर वस्तीत पालिकाच अनधिकृतपणे डम्पिंग ग्राउंड बनवत आहे का अशी शंका त्यामुळे स्थानिक रहिवाशांना पडली असून अश्याने भविष्यात मुलुंड पूर्वच्या नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा लागणार असून ह्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

मुलुंड पूर्वच्या गणेश घाटाजवळ पालिकेच्या मालकीचा एक मोकळा भूखंड असून त्याच्यालगतच कांदलवन पसरलेले आहे. या मोकळ्या भूखंडाचा वापर सध्या पालिकेकडून कचरा डम्पिंग करण्यासाठी केला जात आहे. येथे पालिकेच्या कचरा गाडीतून दर दोन दिवसांनी सुका कचरा आणला जात असून कचऱ्याचे ढीग जमा केले जात आहेत. मोडके लाकडी सामान, भंगारातील सामान, जुने बिछाने, फोमचे तुकडे, थर्माकॉलचे तुकडे, माती, इत्यादी कचरा येथे आणून ढिगारा केला जात आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा, उंदीर, घुशिंचा, डासांचा वावर येथे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आढळून आले आहे. परिणामी भविष्यात येथे अस्वच्छता व दुर्गंधी पसरण्याची भीती निर्माण झाली असून त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होवून रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

भविष्यातील विकास कामासाठी राखीव ठेवलेल्या या भूखंडाचा वापर पालिकेकडून कचरा डम्पिंगसाठी केला जात असल्याबद्दल येथील स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली असून मुलुंड पूर्वेतील मिठागरला डम्पिंग ग्राउंड बनवून सर्वत्र दुर्गंधी पसरवायचा पालिकेचा विचार आहे का असा प्रश्न यानिमित्ताने स्थानिकांनी विचारला आहे. संबधित पालिका अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात विचारणा केली असता लवकरच हा कचरा येथून उचलून अधिकृत डम्पिंग मैदानात टाकला जाईल असे सांगितले.

संबंधित पोस्ट