पालिकेने प्रभादेवीतील ६६ इंचाच्या मुख्य जलवाहिनीतून होणारी गळती शोधून केली दुरुस्ती, लाखो लीटर पाण्याची बचत
- by Reporter
- Oct 29, 2020
- 1002 views
मुंबई २९ ऑक्टोबर: वरळी, किस्मत सिनेमागृह, साईसुंदर नगर, बेंगॉल केमिकल, सेंच्युरी बाजार, आप्पासाहेब मराठे मार्ग, सिद्धीविनायक मंदिर परिसर आदी परिसरां मध्ये पाणीपुरवठा करणाऱया ६६ इंच व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला प्रभादेवी येथील वीर सावरकर मार्ग व मुरारी घाग मार्ग जंक्शन येथे गत काही दिवसांपासून गळती लागल्याचे निदर्शनास आले होते. विशेष म्हणजे वीर सावरकर मार्ग हा सिमेंट काँक्रिटचा रस्ता असल्यामुळे या जल वाहिनीतून होणा-या गळतीबाबत कल्पना येत नव्हती. मात्र मागील काही दिवसांपासून या गळतीमुळे दरदिवशी हजारो लीटर पाणी ड्रेनेजमधून वाहून जात होते. ड्रेनेजमधील ही वाढ हेरुन ‘जी/ दक्षिण’ विभागाने त्याची माहिती त्वरित जल अभियंता विभाग अंतर्गत जलकामे पथकाला दिली.
जलकामे पथकाने सदर ठिकाणी लागलीच तपासणी हाती घेऊन जलवाहिनीतील गळतीचा शोध घेण्यास सुरुवात केली. साऊंड रॉड तंत्राच्या माध्यमातून ही तपासणी करीत असताना, जलवाहिनीत गळती असल्याची शंका आल्याने या विभागाच्या अभियंत्यांनी वीर सावरकर मार्गावरील दत्त मंदिरासमोर आणि मुरारी घाग जंक्शनजवळ रस्त्यांवर जलवाहिनीच्या चारही बाजूंनी खोदकाम केले. हा रस्ता एकमार्गी असल्याने तसेच नवरात्रौत्सवामधील मूर्तींचे विसर्जन याच कालावधीत असल्याने अत्यंत काळजीपूर्वक आणि योजनाबद्धरितीने कामाची आखणी करण्यात आली. सुरक्षिततेची सर्व काळजी घेवून हा अवघड रस्ता फोडून, गळतीचे पाणी रस्त्यावर येऊन वाया जाणार नाही, वाहतुकीला अडथळा येणार नाही, कोणताही अपघात होणार नाही, अशी सर्व दक्षता घेऊन अहोरात्र काम करुन जलवाहिनीतील गळतीचा शोध घेण्यात आला.नंतर, पाण्याचा दाब कमी असताना रात्रीच्यावेळी जलवाहिनी सर्व बाजूंनी मोकळी करुन तपासणी करण्यात आली. त्यावेळी जलवाहिनीच्या तळाशी ३ ठिकाणी गळती आढळली आणि मोठ्या प्रमाणात पाणी ड्रेनेजमधून वाहून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या गळतीच्या ३ ठिकाणी तातडीने लाकडाच्या खुंट्या मारुन गळतीचा मार्ग तत्काळ बंद करण्यात आला. दुसऱया दिवशी एम. एस. टेलपिस वेल्डिंग करुन गळती पूर्णपणे बंद करण्यात आली. अशाप्रकारे अनेक दिवसांपासूनच्या जुन्या गळतीचा जलकामे विभागाने अहोरात्र काम करुन शोध घेतला व तातडीने तसेच योग्य दुरुस्ती करुन लाखो लीटर पाणी वाचविले. याचा परिणाम म्हणून संबंधित परिसरांमध्ये उच्च दाबाने व सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, जल अभियंता श्री. अजय राठोर यांच्या मार्गदर्शनाखाली जलकामे विभागाचे सहायक अभियंता श्री. जीवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम अभियंता श्री. अमित हटवार, कनिष्ठ अभियंता श्री. वैभव गावडे यांच्यासह ‘जी/ दक्षिण’ विभागातील अधिकारी वर्ग यांच्या सहकार्याने हे विशेष काम यशस्वीपणे मार्गी लागले. नवरात्रौत्सवातील देवी विसर्जन तसेच वाहतुकीस कोणताही अडथळा न येऊ देता ही कार्यवाही यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संबंधित परिसरातील नागरिकांनी देखील महानगरपालिकेचे व जलविभागाचे कौतुक केले आहे.
सर्वसाधारणपणे, अशा प्रकारच्या भूमिगत गळती वेळीच निदर्शनास आल्या नाहीत, तर त्या गळती वाढून रस्त्यांचे, आजूबाजूच्या परिसराचे नुकसान होण्याची शक्यता असते. प्रसंगी, अपघातदेखील घडू शकतो. हे धोके लक्षात घेता या कामगिरीचे महत्व लक्षात येते. त्यामुळे संबंधित पथकाचे व अधिकारी – कर्मचाऱयांचे मान्यवरांनी कौतुक केले आहे.

रिपोर्टर