
मुंबईत लागणाऱ्या आगींची आणि अग्निसुरक्षा यंत्रणांची चौकशी करण्याची स्थायी समिती सदस्यांची मागणी
- by Reporter
- Oct 29, 2020
- 1369 views
मुंबई २९ ऑकटोबर: शहरासह परिसरात गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात आगी लागत आहेत. अनधिकृत बांधकाम आणि आग विझल्यावर पुन्हा आग लागत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे मुंबईमधील सर्व मॉलमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे का याची तसेच पुन्हा पुन्हा आग लागत असल्याने त्याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.
नुकतीच मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला आग लागली होती. मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याने आग लागल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे या आगीची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे सदस्य जावेद जुनेजा व समाजवादी पक्षाचे गटनेते व आमदार रईस शेख यांनी केली.
गेल्या दोन महिन्यात मोठ्या आगीच्या घटना घडल्या. रघुवंशी मिलची आग विझवल्यानंतर पुन्हा आग भडकली आणि आगीत इमारत जळून गेली होती. तसेच मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलमध्ये किती बांधकाम अधिकृत होते आणि किती अनधिकृत होते, याची माहिती समोर यायला पाहिजे. आग विझल्यावर पुन्हा आग लागते. कामात कुचराई होत आहे का, याचीदेखील चौकशी व्हायला पाहिजे. त्यासाठी चौकशी समिती नेमून अहवाल सादर करावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले. अन्ट्रीया मॉलचीही चौकशी करण्याचे निर्देश जाधव यांनी दिले.
रिपोर्टर