
जागर महाशक्तीचा" उत्साहात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित मनसा क्रिएशन्सचा ग्लोबल फेसबूक लाईव्ह महोत्सव
- by Adarsh Maharashtra
- Oct 28, 2020
- 918 views
मुंबई (प्रतिनिधी) मनसा क्रिएशन्स प्रस्तूत आणि पत्रकार, लेखिका, कवयित्री प्रिया कालिका बापट निर्मित "जागर महाशक्तीचा" हा नवरात्रोत्सवानिमित्त दहा दिवसांचा ग्लोबल फेसबूक लाईव्ह विचार महोत्सव देश विदेशातील साहित्यिक, कवी, कवयित्री, गायक कलाकारांनी उत्साहात साजरा केला. सलग दहा दिवस चाललेल्या या महोत्सवात व्याख्याने, चर्चासत्र, विषयानुरूप कविसंमेलने आयोजित करण्यात आली होती. रोज संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत महोत्सवात विविधांगी कार्यक्रम सादर केले गेले.
घटस्थापनेदिवशी अर्थात पहिल्या दिवशी शिक्षण आणि राजकीय क्षेत्रातील महनीय व्यक्तीमत्व, समाज कार्यकर्त्या, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या सौभाग्यवती सुलक्षणा प्रमोद सावंत यांनी दिलेल्या व्हीडिओ संदेशाद्वारे "जागर महाशक्तीचा" महोत्सव सुरू करण्यात आला.
त्यानंतर पुणे येथील संगीतकार, गायिका, लेखिका, कवयित्री,गीतकार धनश्री देशपांडे गणात्रा यांचा "माझी रेणूका माऊली" हा गायनाचा कार्यक्रम झाला. पुण्याच्या लेखिका, कवयित्री, संत साहित्याच्या अभ्यासक वैशाली मोहिते यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.दुसर्या दिवशी जे के मीडियाच्या संस्थापक, लेखिका, कवयित्री, प्रकाशक, ज्योती फाऊंडेशनच्या संस्थापक ज्योती कपिले (मुंबई) यांचा "सोशल मीडिया: मनामनांना जोडणारा सेतू" या विषयावरचे विश्लेषणात्मक व्याख्यान झाले.
त्यानंतरचा दुसर्या सत्रात झालेला, महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री, लेखिका, अध्यापिका संजीवनी बोकिल यांच्या "आर्जव" कवितेवरचा "अक्षर संजीवन" कार्यक्रम लक्षणीय ठरला. संजीवनी बोकिल यांच्या "आर्जव" कवितेचा भावानुवाद केलेल्या कवी, साहित्यिकांनी यात सहभाग घेतला होता. स्वत: संजीवनी बोकील या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या. यात सदानंद बेंद्रे (मुंबई), कमलाकर देसले(नाशिक), प्रा.संध्या महाजन (जळगाव), कालिका बापट(गोवा), स्वरूपा सामंत (मुंबई) यांचा सहभाग होता.
तिसर्या दिवशी नागपूर येथील कवयित्री, लेखिका, समाज कार्यकर्त्या, प्रा. विजया मारोतकर यांचा "माँ दुर्गेशी संवाद" या विषयावर व्याख्यान झाले. दुसर्या सत्रात गोव्यातील कोकणी आणि मराठीत स्वतंत्र लेखन करणार्या नामवंत कवयित्रींचे "हे देवी महादेवी" हे कविसंमेलन झाले. गोव्याच्या कोकणी साहित्य क्षेत्रातील प्रथितयश कवयित्री नयना आडारकर यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन झाले यात शीतल साळगावकर, नूतन दाभोलकर, अपर्णा भोबे, पूर्णिमा देसाई यांचा सहभाग होता.
चौथ्या दिवशी मीडियातील नावाजलेल्या व्यक्तीमत्व, वक्त्या, निवेदिका, समाज कार्यकर्त्या क्षिप्रा मानकर(अमरावती) यांचा "भारतीय कर्तृत्ववान महिला" या विषयावर व्याख्यान झाले. तर दुसर्या सत्रात हॉस्टन अमेरीकेच्या ज्येष्ठ, नामवंत शास्त्रीय गायिका वर्षा सातपुते हळबे यांचा "जय देवी जगदंबे" हा गायनाचा कार्यक्रम झाला. मुंबईच्या सुकन्या जोशी यांनी बहारदार निवेदन केले.
पाचव्या दिवशी अखिल भारतीय महिला परिषद गोवा शाखेच्या अध्यक्ष, समाज कार्यकर्त्या प्रिती शेट्ये यांचा त्यांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा आढावा घेणारा कार्यक्रम झाला.
रात्री 8 वाजता दूरदर्शनच्या निवेदिका, कलाकार, कवयित्री, लेखिका, पत्रकार, बहुआयामी व्यक्तीमत्व, स्वाती पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली "पत्रकारीतेतील आव्हाने" या विषयावर चर्चासत्र झाले. यात सुवर्णा जाधव(मुंबई), कविता आमोणकर(गोवा) आणि आरजे माधुरी विजय(पुणे) यांचा सहभाग होता.
सहाव्या दिवशी जळगावच्या प्रा.संध्या महाजन यांचा "मुंगी उडाली आकाशी" या विषयावर व्याख्यान झाले. आदीमाया मुक्ताबाईंच्या जीवनपटावरचा व त्यांच्या कार्याचा आढावा त्यांनी या कार्यक्रमात घेतला. दुसर्या सत्रातील "सलाम रक्षक: जनहितार्थ झटणारे खाकीतले कर्मयोध्दा" हे विशेष कविसंमेलन आकर्षण ठरले. महाराष्ट्र पोलिस दलातील ज्येष्ठ कवी, गझलकार नंदकुमार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन झाले. यात पोलिस खात्यात सेवा बजावणार्या कवयित्री पद्मा मथाईश, विद्या काळदाते, प्राची मुळीक आणि रीता जाधव यांनी सहभाग घेतला होता. कविता सादर करण्याबरोबरच लॉकडाऊनच्या काळात आलेल्या अनुभवांचे त्यांनी कथन केले. मनसाने हे कविसंमेलन सहभागी कवी कवयित्रींच्या सहमतीने भारतभरातील पोलिस खात्यातील रक्षकांना समर्पित केल्याचे यावेळी प्रिया कालिका बापट यांनी जाहीर केले.
सातव्या दिवशी कवयित्री, कलामंच नियत कालिकाच्या संपादक हेमांगी नेरकर(कविवर्य आरती प्रभू यांच्या कन्या) यांचा "कल्पवृक्ष कन्येसाठी" हा आपल्या वडिलांच्या कार्याचा आढावा घेणारा कार्यक्रम झाला. त्यानंतर दुसर्या सत्रात कवयित्री पूजा भडांगे (बेळगाव)यांच्या अध्यक्षतेखाली "राधेची सावळबाधा" हे विशेष कविसंमेलन झाले. यात सोनाली सावळ देसाई (गोवा), पल्लवी पतंगे(मुंबई), शीतल मेटकर (अमरावती), शशिकांत कोळी (मुंबई) आणि प्रिया कालिका बापट (गोवा) यांचा सहभाग होता.
आठव्या दिवशी कला उपासक कल्पना देशपांडे(पुणे)े यांचा कार्यक्रम झाला. दुसर्या सत्रात महाराष्ट्रातील प्रथितयश कवयित्री अॅड.मंदाकिनी पाटील(बदलापूर) यांच्या अध्यक्षतेखाली "मनमुक्त मी" हे प्रस्थापित कवयित्रींचे कविसंमेलन झाले. यात मनीषा अतुल(नागपूर), मनीषा अलका गांधी आसेरकर (मुंबई), मेग मेहन(मुंबई), संगीता अर्बुने(वसई) यांचा सहभाग होता.
शेवटच्या दिवशी अर्थात दसर्या दिवशी विदेशात स्थायिक असलेल्या भारतीय कवयित्रींचे सिमोलंघनाच्या निमित्ताने विजयोत्सव कविसंमेलन झाले. कवयित्री रूपाली मावजो कीर्तनी(आबूदाबी) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनात मोहना कारखानीस (सिंगापूर), श्रध्दा भट(अमेरीका), सुचेता पाटील(अमेरीका) व शिल्पा तगलपल्लेवार(केमन आयलँड) यांचा सहभाग होता.
घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला अर्थात "जागर महाशक्तीचा" ग्लोबल फेसबूक लाईव्ह महोत्सव सुरू व्हायच्या आदल्या दिवशी "पूर्वरंग" हे ज्येष्ठ कवयित्रींचे कविसंमेलन झाले.
मीना समुद्र (गोवा) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कविसंमेलनात मीरा कुलकर्णी(पुणे), निर्मला जोशी (हैदराबाद),माया महाजन(औरंगाबाद) ,अंजली कुलकर्णी(गोवा) यांचा सहभाग होता. संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन प्रिया कालिका बापट यांनी केले. हा संपूर्ण महोत्सव स्त्री शक्तीला वाहिला गेला असून मनसाने लॉकडाऊनच्या काळात आयोजित केलल्या "काव्यमाला काव्यहोत्रा"तील सहभागी कवी कवयित्रींना घेऊन हा महोत्सव साजरा केला असल्याचे मनसाच्या अध्यक्ष कालिका बापट यांनी सांगितले. सर्व सहभागी कवयित्रींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने मनसाने "साहित्यहंसा-आपलं व्यासपीठ" हा फेसबूक ग्रुप तयार केला असून या अंतर्गत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. एकंदरीत जागर महाशक्तीचा ग्लोबल फेसबूक लाईव्ह विचार महोत्सव साजरा करण्यात आला.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम