
सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या पुनर्विकासातील इमारती बांधकामाबाबत प्रस्ताव मागे घेत चौकशी करण्याची मागणी
- by Reporter
- Oct 28, 2020
- 799 views
मुंबई,२८ ऑकटोबर : एफ/उत्तर विभागातील सायन लोकमान्य टिळक सर्वसाधारण महानगरपालिका रुग्णालयाच्या पुनर्विकासातील इमारती बांधकामाबाबत मेसर्स अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट ( इंडिया ) लिमिटेड ही एकच निविदा प्राप्त झाली असताना नियमाप्रमाणे दुसऱ्यादा निविदा न काढता याच कंत्राटदाराला काम देण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न लक्षात घेता स्थायी समितीचा प्रस्ताव मागे घेत चौकशी करण्याची मागणी अनिल गलगली यांनी केली आहे .
मागील वर्षी सुद्धा मेसर्स अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट ( इंडिया ) लिमिटेड हा कंत्राटदार निविदेत होता आणि वाटाघाटी करण्यात आल्या. पण तत्कालीन अतिरिक्त आयुक्त असलेल्या डॉ अश्विनी जोशी यांच्या योग्य निर्णयामुळे पालिकेचा लाभ झाला आणि होणारा आर्थिक फटका बसला नाही.
आज पुनश्च ऑनलाईन निविदेत मेसर्स अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट ( इंडिया ) लिमिटेड हाच कंत्राटदार एकमेव आहे आणि पालिका प्रशासनाने नियमाचे उल्लंघन करत स्थायी समितीत प्रस्ताव आणला आहे. यापूर्वी महापालिका प्रशासनाने कोणत्याही निविदेत एकच निविदा प्राप्त झाल्यास नवीन निविदा जारी केल्या आहेत पण एफ/उत्तर विभागातील सायन लोकमान्य टिळक सर्वसाधारण महानगरपालिका रुग्णालयाच्या पुनर्विकासातील इमारती बांधकामाबाबत मेसर्स अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट ( इंडिया ) लिमिटेड या कंत्राटदारास झुकते माप दिले आहे. स्पर्धात्मक निविदेत किमान ३ कंपन्यांनी सहभागी होणे आवश्यक आहे तरीही पालिकेने दुर्लक्ष केले आहे. मागील वेळेस विविध करांसह ६७२ कोटी रुपयांना देण्यात येणारे हे कंत्राट यावेळी ७३३ कोटी रुपयांना दिले जात आहे.
विशेष म्हणजे सिव्हिल आणि इलेक्ट्रिक कामाच्या दरात तफावत असून यापूर्वी अन्य रुग्णालयात पुनर्विकास अंतर्गत अन्य कंत्राटदाराकडून दिलेल्या दराचे निरीक्षण करून तांत्रिक समितीकडून तपासणी करणे आवश्यक आहे जेणेकरुन पालिकेला नुकसान होणार नाही. कोरोना काळात सदर काम तातडीचे नसून फेरनिविदा काढणे शक्य आहे पण जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले आहे.
तरी एफ/उत्तर विभागातील सायन लोकमान्य टिळक सर्वसाधारण महानगरपालिका रुग्णालयाच्या पुनर्विकासातील इमारती बांधकामाबाबत मेसर्स अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट ( इंडिया ) लिमिटेड ही एकच निविदा प्राप्त झाली असताना नियमाप्रमाणे दुसऱ्यादा निविदा न काढता याच कंत्राटदाराला काम देण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न लक्षात घेता स्थायी समितीचा प्रस्ताव मागे घेत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे .
रिपोर्टर