माझगाव भूखंड प्रकरण गैरव्यवहाराबाबत अहवाल 15 दिवसात द्या- नाना पटोले

मुंबई, दि. 28 : माझगाव भूखंड क्र.593 या महसूल विभागाच्या शासन मिळकतीच्या भूभागाचा गैरवापर व गैरव्यवहाराबाबत महसूल मंत्री यांच्याकडे पुनर्विलोकनासाठी 15 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यात यावा असे निर्देश विधानसभा अध्यक्ष, श्री. नाना पटोले यांनी दिले.

माझगाव येथील भूखंड क्र.593 या महसूल विभागाच्या शासन मिळकतीच्या भूभागाचा गैरवापर व गैरव्यवहाराबाबत तसेच विकसन करारामुळे शासनाचे झालेले कोट्यवधी रुपयांचे नुकसान यासंदर्भात विधानभवन येथे बैठक झाली. यासंदर्भात अर्जदार सतिष खांडगे यांनी निवेदन दिले आहे.

यावेळी महसूल मंत्री, श्री. बाळासाहेब थोरात, अप्पर मुख्य सचिव महसूल नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधानसचिव भूषण गगराणी, कामगार उपायुक्त बाळासाहेब वाघ, महसूल विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण, विधी व न्याय विभागाचे सहसचिव नितीन जिवणे तसेच संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले म्हणाले, माझगांव भूखंड क्र. 593 या शासकीय मिळकतीचे नूतनीकरण व हस्तांतरण तसेच विकसन करारामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान याबाबत तपास करण्यात यावा. विभागाचे सचिव यांनी याप्रकरणाचा आढावा घ्यावा.


जागा शासन मिळकतीची असून बी.आय. आर.एफ., महसूल व वन विभाग, नगरविकास विभाग, कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, मुंबई शहर या सर्वांच्या अनुमतीने अटी व शर्तीनुसार जमिनीवर भाडेकरार व  पुनर्विकास करण्यास परवानगी देण्यात आली होती.  सदर भूभागावर 10 हजार स्पींडलची सूत गिरणी पुनर्विकासाच्या परवानगीनंतर 6 महिन्यांत सुरु करण्याचे आदेश होते.  याबाबत संबंधितांना परवानगी दिली होती, आजतागायत याठिकाणी मिल सुरु करण्यात आलेली नाही. शासन मालकीच्या या जमिन प्रकरणातील विकसनाचे व्यवहार गुंतागुतीचे असून वित्तीय सहाय्य, तारणाचे व्यवहार, जमिन हस्तांतर करतांना ठरविली गेलेली किंमत आदी अनेक बाबींसंदर्भात तपशीलवार मुद्दे यावेळी मांडण्यात आले. यासंदर्भात सर्व बाबी तपासून 15 दिवसाच्या आत महसूल मंत्री यांना अहवाल सादर केला जाईल असे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितिन करीर यांनी सांगितले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट