तसे ते श्रीमंत नसूनही दानशूर आहेत .
- by Adarsh Maharashtra
- Oct 23, 2020
- 1343 views
उल्हासनगर(रामेश्वर गवई) : दानशूर व्यक्ती ही श्रीमंत असावी लागते असा गैरसमज सर्वत्र पसरलेला आहे. मात्र स्वतः श्रीमंत नसूनही अनेकांना मदतीचा हात देणारे, आधार देणारे एक आगळे वेगळे व्यक्तीमत्व उल्हासनगर मधे आहे.ते म्हणजे- ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध असलेले, तसेच साहित्यिक म्हणून वेगळीच ओळख असलेले दिलीप मालवणकर सर .
आपल्या परिचयातील एखादी व्यक्ती संकटात आहे,अडचणीत आहे,असे समजताच मदतीसाठी धावून जाणारे दिलीप मालवणकर सर मी गेली तीस वर्षे पाहत आहे. एसएससी व्याख्यानमाला, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत, खेळाडूंना मदत असे कार्य ते ३५ वर्षाहून अधिक काळ करीत आहेत.
ते पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेचा आपल्या उपजीविकेसाठी उपयोग केला नाही. दैनिक नवशक्ती,दै.सामना,दै.
सन्मित्र, दै.अमृत कलश,दै.जनादेश,जनमत, दै.सांजवात व स्वतःचे अजब लोकशक्ती साप्ताहिक व आता मुक्त पत्रकारीता असा चाळीस वर्षांचा प्रवास त्यांनी केला आहे. ते म्हणतात मी पत्रकारितेतून मिळालेले मानधन आजवर स्वतः साठी कधीच वापरले नाही. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी मी त्याचा उपयोग केला. ही त्यांची मदतीची भावनाच सर्व काही सांगून जाते. आधी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील स्टेनोची नोकरी,ती अवघ्या सात वर्षात सोडून पत्रकारितेला वाहून घेतले.परंतू त्यासाठी पत्रकार म्हणून तडजोड करून अर्थार्जन करण्याऐवजी त्यांनी हेमांगी प्रिंटर्स हा छपाईचा स्वयंरोजगारासोबतच इतर आठ दहा लोकांना रोजगार मिळवून देणारा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय २० वर्षे अखंड पणे सुरू होता. त्यानंतर त्यांनी अस्मिता कॅटरर्स हा व्यवसाय सुरू करून त्यातही अनेकांना रोजगार मिळवून दिला. हे करीत असताना त्यांनी गरजूंना मदत देण्यात खंड पडू दिला नाही. मध्यंतरी ते १९९२ ते १९९६ दरम्यान दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले व त्यांनी आपल्या अभ्यासू व परखडपणाने ही कारकीर्द ही संस्मरणीय केली.या काळात त्यांनी अनेक संस्मरणीय कार्य केले. उदा. फिश मार्केट, छत्रपती शिवाजी नगर येथील भव्य व्यासपीठ मैदानात कुंपण, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची सुटका व स्थापना, गल्लीबोळातील रस्ते, सार्वजनिक शौचालयं इत्यादी. नगरसेवक पदाच्या काळात त्यांनी अनेक सेवाभावी संस्थांना अनुदान रूपी मदत मिळवून दिली.त्यानंतर आजवर असे अनुदान कोणी दिलेले नाही. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, क्रिकेट,
फुटबॉल, बुद्धीबळ, कॅरम यासारख्या अनेक स्पर्धांचे आयोजन केले. कॅरमपटू सुजाता हायलिंगे, तबलापटू व शास्रीय गायिका रिद्धि -सिद्धी बोरकर यांना मिळवून दिलेले अनुदान उल्लेखनीय आहे. १९८५ साली आमरण उपोषण करून वाचवलेले व कुंपण घालून संरक्षित केलेले व्हिटीसी मैदान, हे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
गेल्या दहा वर्षात त्यांनी अनेक संस्था व व्यक्तींना मदत मिळवून दिली.यात यवतमाळ येथील स्नेह आधार संस्था, पुणे येथील महिला बाल भवन, नाशिक येथील आधारतीर्थ आधार आश्रम, टिटवाळा येथिल पारस बाल भवन, सांगली येथील सार्वजनिक वाचनालय, अशा अनेक संस्थांना मदत केली आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका पुष्पाताई पागधरे यांच्या हलाखीच्या काळात त्यांना दिलेला गौरव निधी विशेष उल्लेखनीय आहे. या शिवाय ते अनेक संस्थांच्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभागी होतात व यथाशक्ती सहकार्य करतात. उल्हासनगर येथील श्री कालिका कला मंडळ या सर्वात जुन्या संस्थेचे ते कार्याध्यक्ष असून त्यांच्या कार्यकाळात सर्वांनी मिळून एक भव्य सभागृह उभारून उल्हासनगरच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकली आहे. बुके ऐवजी बुक ही संकल्पना ते अनेक वर्षांपासून राबवत असून प्रत्येक वेळी पाहूणे वा सत्कारमूर्तींना पुस्तक देऊन सत्कार करतात. विशेष करून शैक्षणिक कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना आत्मचरित्र, शब्दकोश अशा प्रकारची पुस्तकं भेट देतात. अनेक संस्थांच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यकर्ता म्हणून सक्रिय आहेत. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर शाखा, सिंध महाराष्ट्रीय समाज संचलित उल्हास विद्यालय, सार्वजनिक मित्र मंडळ, या संस्थांचा समावेश आहे.
त्यांनी केलेली उपोषणं,आंदोलनं, संघर्ष भ्रष्टाचाराविरोधात केलेले युध्द, अनेक घोटाळे उघडकीस आणून महापालिकेचे वाचलेले कोट्यावधी रूपये, हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
संकटात असलेल्या मित्र परिवारास मदत करणे हे ते आपले कर्तव्य मानतात. उल्हासनगरचे सामाजिक कार्यकर्ते परमानंद गरेजा यांना अटक झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरच्यांना दहा हजार रूपये रोख नेऊन दिले होते. या शिवाय अनेक गरजू महिलांना मदत करतात.पण त्यांचा नामोल्लेख ते करीत नाहीत. सामाजिक कार्यकर्ते भरत खरे यांच्या निधनानंतर महापालिकेने पाच लाख अनुदान देण्याचा ठराव केला परंतू प्रत्यक्षात काहीच दिले नाही. अनेक नेते,डाॅक्टर यांनी मदत देण्याच्या घोषणा केल्या, चेक देताना फोटो काढले परंतू प्रत्यक्षात काहीच मदत केली नाही. त्यावेळी दिलीप मालवणकर यांनी स्वतःचा मदत निधी देऊन लोकांना आवाहन केले व सुमारे सव्वा लाख रूपये खरे परिवारास मिळवून दिले.इतकेच करून ते थांबले नाहीत तर प्रथम स्मृती दिनी स्वखर्चाने भव्य असे आरोग्य शिबीरही आयोजित केले.भरत खरे यांच्या परिवारास स्वयंरोजगार निर्माण करून देण्यात पुढाकार घेतला.
लाॅकडाऊनमुळे पत्रकार बांधव आर्थिक अडचणीत आले आहेत, हे लक्षात येताच त्यांनी सतत तीन महिने १५ ते २० पत्रकारांना आर्थिक व किराणा सामानाची मदत मिळवून दिली. अनेक सहका-यांना आजारपणात कोरडी सहानुभूती न देता आर्थिक मदत दिली. अन्याय विरोधी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सुभाष भोसले यांचे अकस्मात निधन होताच त्यांच्या परिवारासही ११ हजार रोख मदत केली. नुकतेच पत्रकार संजय साळवे यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन झाल्यावर साळवे कुटुंबीयांना आर्थिक मदत केली.
यावेळी तर ते स्वतः कोरोनाग्रस्त असूनही त्यांनी मदत केली, हे एक वैशिष्ट्य आहे.
स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही व पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वाभिमानाने जगत असताना ते जे मदत कार्य करीत आहेत, ते गर्भश्रीमंत व करोडपती लोकांना ही लाजवणारे व अंतर्मुख करावयास लावणारे आहे. उल्हासनगरला व आमच्या अन्याय विरोधी संघर्ष समितीस असा आदर्श कार्यकर्ता लाभला, हे आमचे भाग्यच आहे.
परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावे,त्यांचा दीर्घ सहवास आम्हाला लाभावा व त्यांच्या या मदत कार्याचा यज्ञ सतत तेवत राहावा,हिच सदिच्छा !
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम