
कोरोना काळातील उद्धव ठाकरेंचे आश्वासक नेतृत्व
- by Adarsh Maharashtra
- Oct 20, 2020
- 1473 views
मुलुंड :(शेखर भोसले) २००४ नंतरचा काळ शिवसेनेसाठी फारसा चांगला नव्हता. देशात आणि राज्यात काँग्रेसची राजवट होती, त्याआधी नारायण राणे मग राज ठाकरे अशी मात्तबर नेतेमंडळी पक्ष सोडून गेली होती. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना पक्षाचे काय होणार याची चर्चा राजकीय चाणाक्षांमध्ये होवू लागली होती. परंतु आपल्या कुशल नेतृत्वाने पक्षाची घडी योग्य पद्धतीने राखण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले. उद्धव यांनी पक्षातील जुने, नवे, निष्ठावान, मवाळ आणि आक्रमक अशा सगळ्याच घटकांना सोबत घेऊन पक्ष चालवला. इथेच त्यांच्यातील प्रशासक घडत गेला. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाढत गेली आणि अधिक प्रगल्भ होत गेली.
२०१४ ते २०१९ पर्यंत भाजपासोबत शिवसेना सत्तेत होती. या पाच वर्षात सत्तेचा मोठा वाटा भाजपाने आपल्याकडे ठेवला होता व शिवसेनेच्या वाट्याला कमी महत्वाची खाती देवून शिवसेनेचे महत्व कमी करायचा प्रयत्न चालू केला होता. शिवसेनेला संपवण्याचा भाजपाचा डाव होता परंतु चाणाक्ष उद्धव ठाकरेंच्या बुद्धीने हे सर्व हेरल्याने भाजपाच्या सर्व चाली त्यांच्या लक्षात येत गेल्या आणि म्हणूनच २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे ५६ आमदार निवडून आले असतानाही त्यांनी भाजपासोबत सत्तेत भागीदारी न घेता राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला सोबत घेवून महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन केली आणि बाळासाहेबांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून स्वतः मुख्यमंत्री झाले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याचा कारभार योग्य रीतीने हाकत असतानाच मार्चमध्ये कोरोनाचे संकट देशावर व राज्यावर आले. परंतु कोरोनाचे संकट हे त्यांच्या नेतृत्व कौशल्याला वाव देणारे ठरले. देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र राज्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. लोकसंख्या जास्त असल्याने महाराष्ट्र तसेच मुंबईत कोरोना रुग्णसंख्या अधिक असणे हे स्वाभाविक आहेच परंतु कोरोना महामारीच्या या कठीण काळात महाराष्ट्राची परिस्थिती इतर राज्याच्या तुलनेत अधिक चिंताजनक असतानाही तसेच राज्य सरकारवर प्रचंड ताण असतानाही उद्धव ठाकरे यांनी खंबीरपणे परंतु तेवढ्याच संयमाने, आपल्या प्रशासकीय कौशल्याने आलेल्या सर्व संकटांचा सामना करत अतिशय उत्कृष्टपणे परिस्थिती हाताळत या कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवले आहे.
या महामारीमुळे शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक आरोग्य, पोलिस, स्थानिक शासन तसेच राज्याचे प्रशासन, शेती, शेतीवर आधारित उद्योगधंदे, अन्न व नागरी पुरवठा, इत्यादी विभाग अत्यंत कौशल्यपूर्ण हाताळून राज्यातील जनतेला आवश्यक ती मदत व मूलभूत सेवा सुविधा पोहचवण्याचे महत्वपूर्ण कार्य उद्धव ठाकरेंच्या सरकारने अगदी चोखपणे पार पडले.
त्यातच तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून मुख्यमंत्री या नात्याने जनतेशी 'लाईव्ह' संवाद साधत महाराष्ट्र शासनाने कोरोना संबंधित घेतलेल्या निर्णयांची तसेच करत असलेल्या कार्याची इत्यंभूत माहिती देत "तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो" असे आश्वासन देवून राज्यातील जनतेला त्यांनी प्रत्येक वेळी दिलासा व विश्वास दिला जो सध्याच्या परिस्थितीत अत्यंत आवश्यक आणि महत्वपूर्ण आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर भागात परप्रांतीय मजुरांची व विद्यार्थ्यांची संख्या कुठल्याही इतर राज्यांपेक्षा जास्तच आहे. या परप्रांतीय मजुरांची व विद्यार्थ्यांची निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली त्याचबरोबर अशा मंडळींची उपासमार होऊ नये म्हणून शिवभोजन योजनेचा विस्तार तालुका स्तरावर करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली. शिवभोजन थाळी पाच रुपये किंमतीत उपलब्ध केली. यासाठी महाराष्ट्र शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद देखील केली. राज्यशास्त्रीय अवलोकनात ही शिवभोजन योजना लोकानुनयी ठरत असेल परंतु सद्यपरिस्थितीत त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये सत्तेतील शिवसेना कशी कूस बदलतेय हे प्रकर्षानं जाणवते. मग ‘आरे’ संदर्भातील निर्णय असो किंवा ‘एल्गार परिषद’ प्रकरण असो, उद्धव ठाकरे संयमी भूमिका घेताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बोलण्या-वागण्यात कुठलाही आततायीपणा नाही. या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सरकारचे काही निर्णय नियमित व आवश्यक स्वरूपाचे असले, तरी राजकीयदृष्ट्या देखील ते महत्त्वाचे वाटतात.
कोरोनाची परिस्थिती काहीशी निवळल्यामुळे लॉकडाऊन नंतर कालांतराने अनलॉक प्रक्रिया सुरु करताना देखील कोणत्याही दबावाला बळी न पडता, राज्यातील सर्व जनतेची स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे काळजी करत, जनतेवर, पोलिस व स्थानिक प्रशासनावर कोणताही ताण येणार नाही व कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढणार नाही यांची संपूर्णपणे खबरदारी घेत त्यांनी टप्प्याटप्प्याने एकेक गोष्टी खुल्या केल्याने त्यांचे प्रशासन कौशल्य पुन्हा उठून दिसले.
उद्धव ठाकरेंचे उत्कृष्ट नेतृत्वच महाराष्ट्रातील जनतेला कोरोनाच्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्यामुळे एक खंबीर आणि आश्वासक नेता म्हणून उद्धव ठाकरे यांची मजबूत प्रतिमा देशासमोर यशस्वीपणे पुढे आली आहे. या सर्व बाबींमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच असून, त्यांच्यासारखा संवेदनशील, कर्तृत्ववान मुख्यमंत्री महाराष्ट्रातील जनतेला मिळाला हे महाराष्ट्राचे भाग्यच समजावे. आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर उद्धव ठाकरे लोकांची मने जिंकत आहेत. उद्धव ठाकरेंमुळे ‘स्विंग वोटर’ शिवसेनेकडे अधिक अपेक्षेने बघेल हे मात्र नक्की यातून शिवसेनेला भविष्यात चांगलाच राजकीय फायदा होणार, हे राजकीय जाणकार देखील मान्य करत आहेत. राज्यातले बदललेले राजकीय वास्तव, पक्षांतर्गत झालेले आमूलाग्र बदल आणि देशावर कोसळलेले आरोग्यसंकट यांमुळे नवी शिवसेना उदयास येत आहे यात काही शंका नाही.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम