माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे सोमवारी एक पत्र लिहिलं. या पत्रातून त्यांनी राज्यातील मंदिरं पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. अतिशय खरमरीत रोखानं लिहिलेल्या या पत्रात त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचा मुद्दाही अधोरेखित केला.दरम्यान, राज्यपालांनी हे पत्र लिहिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याच्य्या बऱ्याच ठिकाणी मंदिरं पुन्हा उघडण्यासाठी आंदोलनं केली गेल्याचं पाहायला मिळाली. भाजपच्या नेतृत्त्वाखाली विविध ठिकाणी ही आंदोलनं केल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे राज्यपालांच्या या पत्रामुळं पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राज्यपाल अशा संघर्षानं डोकं वर काढलं आहे.

'माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही' अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सुनावले. 'माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे, हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

उद्धव ठाकरेंनी पत्रात काय लिहिले

'प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार जरुर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॉकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी करुन दिली.

'आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. Have you suddenly turned 'Secular' yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा 'Secularism' आहे तो आपल्याला मान्य नाही का?मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे.आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही. इतर राज्यात, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे' असेही उद्धव ठाकरेंनी सुनावले.

'आपण म्हणता गेल्या तीन महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील तीन पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तिन्ही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो.असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत असून सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल ही खात्री मी आपल्याला देतो' असेही उद्धव ठाकरेंनी निक्षून सांगितले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रात काय लिहिले होते?

'तुम्ही एक जूनला पुनश्च हरिओम म्हणत लॉकडाऊन या शब्दाला केराची टोपली दाखवलीत. त्यामुळे लॉकडाऊनला वैतागलेल्या जनतेच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. दुर्दैवाने चार महिन्यांनंतरही प्रार्थना स्थळांवरील बंदी कायम राहिली. राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार आणि बीचवर जाण्यास परवानगी दिली असताना देव-देवता लॉकडाऊनमध्ये असणं, यासारखा विरोधाभास नाही.' असा टोला राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. गेल्या तीन महिन्यात धार्मिक, राजकीय नेते आणि एनजीओंनी माझी भेट घेतली आणि प्रार्थनास्थळे उघडण्याची विनंती केली, असेही कोश्यारी यांनी पत्रातून सांगितले.'हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अयोध्या दौऱ्यातून आपण भगवान श्रीरामाविषयीच्या भक्तीचे जाहीर दर्शन दिलेत. आषाढी एकादशीला आपण पंढरपुरातील विठ्ठल रखुमाईची पूजा केली होतीत. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्या कोणतीही दैवी सूचना मिळत आहे की काय, याचे मला आश्चर्य वाटते. की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होतात, ती धर्मनिरपेक्षता तुम्ही अंगिकारली की काय, याचेही कुतूहल वाटते' असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रात म्हटले होते.तसेच 'दिल्लीत 8 जूनला, तर देशाच्या इतर भागात जून महिन्याच्या अखेरीस प्रार्थनास्थळे उघडली होती. पण त्यानंतर कोव्हिड रुग्णांमध्ये वाढ झाल्याची उदाहरणे पाहायला मिळाली नाहीत. त्यामुळे कोव्हिड संबंधी काळजी घेण्याच्या सर्व सूचना देऊन प्रार्थनास्थळे पुन्हा उघडण्याची घोषणा करावी' अशी विनंती राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना केली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट