
राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी भाजपचं राज्यभर घंटानाद आंदोलन सुरू,तर भाजपच्या नेत्यांकडून सिद्धिविनायक मंदिरात घुसण्याचा प्रयत्न
- by Adarsh Maharashtra
- Oct 13, 2020
- 1145 views
मुंबई :राज्यात कोरोना शिरकाव झाल्यानंतर टाळेबंदीची घोषणा करण्यात आली होती.मात्र पुनश्च हरिओम अंतर्गत अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या राज्यात अनलॉक 5 सुरू असून, मंदिरं उघडी करण्यासाठी भाजपच्या वतीने आज राज्यभरात मंदिरं खुली करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. ठाकरे सरकारने मंदिरं उघडी करायला परवानगी द्यावी अशी प्रमुख मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.त्यामुळे आज राज्यभरातील मंदिरांसमोर मंदिराचे व्दार उघडण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.
आज सकाळपासूनच पुणे, शिर्डी, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. शिर्डीत भाजपच्या अध्यात्मिक समन्वय समितीकडून आंदोलन सुरु आहे.याठिकाणी धर्मगुरू आणि आचार्यांकडून लाक्षणिक उपोषण केले जात आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फलकबाजीही करण्यात आले.'मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार', असा मजकूर या फलकांवर लिहण्यात आला आहे.
भाजपच्या नेत्यांकडून सिद्धिविनायक मंदिरात घुसण्याचा प्रयत्न
मुंबईत प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सिद्धिवनायक मंदिरांत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या सर्वांना रोखले. तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावरच गणपतीची आरती करण्यात आली.
गेल्या 17 मार्च पासून मंदिर बंद असल्याने शिर्डीतील अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. दरोरोज करोडो रुपयांची उलाढाल शिर्डीत होत असते. तर देश विदेशातून भाविक साईंच्या दर्शनाला येत असतात. शिर्डीत मोठ्या प्रमाणात हॉटेल, हारफुलें, प्रसाद, मूर्त्यांची विक्रीचा व्यवसाय केला जातो. तसेच अनेक छोटे मोठे व्यवसाय हे मंदिरावर अवलंबून आहेत. मात्र, मंदिर बंद असल्यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे मंदिर उघडण्याच्या मागणीने शिर्डीत जोर धरला आहे.
तर पुण्यात तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरु आहे. झोपी गेलेल्या या कुंभकर्ण रुपी सरकारला जागे करणारे प्रतीकात्मक आंदोलन पुणे शहर भाजप करेल. कुंभकर्णाची प्रतिकात्मक प्रतिमा तयार करण्यात येणार आहे. घंटानाद, शंखनाद, भजन, तुतारी अशी पारंपरिक वाद्य वाजवून या आधुनिक कुंभकर्णाला जागे करु, असे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.
तर मुंबईतही सिद्धीविनायक मंदिराच्याबाहेर भाजपकडून लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्रात वाईन शॉप आणि बार सुरु होतात. मात्र, आमचे श्रद्धास्थान असलेल्या आणि आमचे मन शांत होईल, अशी मंदिरे उघडण्यास सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. मुख्यमंत्री सोईने स्वत:ची जबाबदारी जनतेवर ढकलत आहेत.
एकीकडे शेतकऱ्याचा भाजीपाला घरपोच करता येणे शक्य नाही. मात्र, सरकार बार सुरु करते. त्यामुळे हे सरकार नेमके कुठे चाललेय, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. मंदिरांना हवं तर रेस्टॉरंट आणि जिमसारखे नियम लावा. पण मंदिरे उघडाच अशी मागणीही दरेकर यांनी केली. मंदिरांवर अनेक लोकांचा रोजगार अवलंबून आहे. त्यामुळे मंदिरे सुरु झाली नाही तर लोक कोरोनाऐवजी उपासमारीने मरतील, असेही दरेकर यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम