शिवसेना - काल, आज आणि उद्या

मुलुंड :(शेखर भोसले)१९५० च्या दशकात “मुंबईसह संयुक्‍त महाराष्ट्र” म्हणजेच मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य स्थापन व्हावे म्हणून दिल्लीतील कॉंग्रेस नेत्यांच्या आडमुठेपणा विरोधात तसेच महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांच्या करंटेपणाविरोधात मराठी माणसाला उग्र आंदोलन करावे लागले. संयुक्‍त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर या आंदोलनासाठी कॉम्रेड एस. ए. डांगे, साथी एस. एम. जोशी आणि आचार्य अत्रे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या “संयुक्‍त महाराष्ट्र समिती’त फूट पडली. या फुटीमुळे मराठी माणसांचे प्रश्‍न उचलून धरणारे व मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारे बलशाली नेतृत्व शिल्लक उरले नव्हते. त्यामुळे हवे असलेले भाषिक राज्य मिळाल्यानंतरही “आपले प्रश्‍न काही सुटत नाहीत” अशी भावना मुंबईतील मराठी माणसाच्या मनात निर्माण झाली. या पार्श्‍वभूमीवर मराठी माणसांच्या हक्‍कांचा विषय अजेंड्यावर आणण्यासाठी, मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादाने १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यामुळे साहजिकच मराठी माणसाला एक भावनिक आधार सापडला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व हे प्रस्थापित सर्वच राजकीय नेत्यांपेक्षा वेगळे आणि मुख्य म्हणजे अत्यंत आक्रमक होते. बाळासाहेबांची वेशभूषा, त्यांच्या तोंडातील पाईप, त्यांच्या भाषणाची बिनधास्त शैली आणि मुख्य म्हणजे ‘मार्मिक’मधील बोचऱ्या व्यंगचित्रांमुळे त्यांच्याभोवती निर्माण झालेले वलय आदी विविध कारणांमुळे मुंबई-ठाणे परिसरातील मराठी माणसांचा एक मोठा समूह त्यांच्याकडे ओढला गेला. त्यात बेरोजगार मराठी युवकांचा भरणा मोठा होता. आता हीच संघटना आपले प्रश्‍न सोडवू शकेल, अशी भावना किमानपक्षी मुंबई तसंच ठाणे परिसरातल्या मराठी माणसाच्या मनात निर्माण झाली होती. शिवसेनेनं अगदी सुरुवातीच्या काळातच मुंबईतील तृतीय श्रेणीच्या म्हणजेच स्टेनोग्राफर, टायपिस्ट, पीए आदी पदांवर मोठ्या संख्येनं काम करत असलेल्या दाक्षिणात्यांच्या विरोधात उग्र आंदोलन पुकारलं. त्यातून मराठी अस्मितेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. हे सर्व राजकारण करत असताना बाळासाहेबांच्या भोवतीची गर्दी सातत्याने वाढतच होती. 

शिवसेनेच्या स्थापनेनंतर ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा झाला. या मेळाव्याला लाखोंची गर्दी जमली. बाळासाहेबांनी या मेळाव्यात केलेल्या पहिल्याच तडाखेबाज भाषणाने मराठी माणसांची मने जिंकली होती. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण, असे सांगत जन्म घेतलेल्या शिवसेनेने १९६७ मध्ये पहिल्यांदाच ठाणे महानगरपालिका निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेना सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला. १९६८ मध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने जोरदार प्रचार करत उडी घेतली आणि सेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला.
त्याकाळी शिवसेनेचा कम्युनिस्टांबरोबचा संघर्ष सुरू झाला. लालबाग-परळ या गिरणगावात असलेला लाल बावट्याचा जोर शिवसेनेने मराठी माणसाच्या न्याय्य हक्काचा वापर करत कमी करायला सुरुवात केली. १९६९ मध्ये बाळासाहेबांनी प्रथम डॉ. हेमचंद्र गुप्ते मग सुधीर जोशी आणि नंतर मनोहर जोशी अशा आपल्या तीन नेत्यांना मुंबईच्या महापौरपदावर निवडून आणण्यात यश मिळवले. १९७० साली लालबागमधील कृष्णा देसाई या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आमदाराचा खून झाला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत कृष्णा देसाई यांच्या पत्नीचा पराभव करत वामनराव महाडिक हे प्रचंड मतांनी विजयी झाले.

मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघात १९८७ मध्ये जाहीर झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणूकीच्या प्रचारात बाळासाहेबांनी “गर्व से कहो हम हिंदू है!’ ही घोषणा घराघरांत नेली. तो काळ रामजन्मभूमी मुक्‍ती आंदोलनासाठी विश्‍व हिंदू परिषदेने उभारलेल्या आंदोलनाचा होता आणि बाळासाहेबांनी तोच विषय आपल्या अजेंड्यावर घेतला. या निवडणुकीत शिवसेनेचे रमेश प्रभू निवडून आले. 

१९९० च्या निवडणुकीत सेना-भाजप युतीच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन बाळासाहेब मैदानात उतरले. शिवसेनेने आक्रमक हिंदुत्ववादाचा स्वीकार केला व बाळासाहेब ठाकरे यांनी आक्रमक भाषणे करून वातावरण ढवळून काढले. एकच लक्ष्य विधानसभा, ही घोषणा होती. युतीने पहिल्यांदाच महाराष्ट्रातील साखरेभोवती फिरणाऱ्या मराठा राजकारणाला हादरा दिला. 

त्याच्या पुढच्याच वर्षी बाबरी मशीद पडली तेव्हा, बाबरी माझ्या शिवसैनिकांची पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असे वक्तव्य करण्याचे धाडस बाळासाहेबांनी केले. मराठी मतांबरोबर तेव्हा बाळासाहेबांनी हिंदूची मने जिंकली. मुंबईत दंगे भडकले. बाळासाहेबांच्या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेनेवर टीका होऊ लागली. मात्र पहिल्यांदाच हिंदुत्वाच्या नावावर तयार झालेला विशाल जनाधार शिवसेनेच्या हाती आला. १९९५ साली शिवसेना-भाजपने पहिली विधानसभा निवडणूक जिंकली आणि राज्याची सत्ता हाती आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. शेवटच्या सहा महिन्यांसाठी नारायण राणे यांना मुख्यमंत्री बनविले.

शिवसेनेच्या पहिल्या चार दशकांतील प्रवासावर एक धावती नजर टाकली तरी सहज लक्षात येते की त्या काळातील शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना होती. त्या चार दशकांत बाळासाहेबांचा “करिष्मा’ हेच शिवसेनेच्या भात्यातील ब्रह्मास्त्र होते. या चार दशकांत बाळासाहेबांनी अनेक वेळा परस्पर विरोधी आणि एकमेकांना छेद देणारे निर्णय घेतले. मात्र, त्या त्या क्षणाला घेतलेल्या कोणत्याही निर्णयानंतर शिवसैनिक बाळासाहेबांच्या पाठीशी ठामपणेच उभे राहत असत. 

उद्धव ठाकरे १९९५ ला सत्ता मिळाली तरी तसे लोकांसमोर नव्हते. ते सक्रीय होते. मात्र पडद्यामागून. शिवसेनेची प्रचार रणनीती ठरवण्यात ते होते. शिवसेनेच्या प्रचार आणि प्रसारात मुख्य भूमिका निभावणाऱ्या दैनिक सामनाच्या प्रकाशनापासून प्रत्येक घडामोडीत उद्धव ठाकरे सहभागी होते. तरीही त्यांची लोकांच्या मनात असलेली प्रतिमा होती ती फक्त छायाचित्रकाराची. परंतु आपल्या कर्तृत्वाने त्यांनी दाखवून दिलं की शिवसेनाप्रमुखांचा राजकीय नेतृत्वाचा वारसाही त्यांनी जपलाय.

१९९९ मध्ये शिवसेनेची सत्ता गेली. त्याचवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या हाती जबाबदाऱ्या वाढवण्यास सुरुवात केली. त्यांनी त्या समर्थपणे पेलल्याही. सुरुवात २००२ च्या मनपा निवडणुकीत सत्ता राखण्याचे आव्हान पेलून झाली. संयमी असलो तरी आक्रमक शिवसेनेला आपण पुढे नेऊ शकतो हेच त्यांनी कृतीतून दाखवून दिले. यश हे यशच असतं. महापालिकेत विजय मिळाला आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीला मान्यता मिळण्यासही सुरुवात झाली.

महाबळेश्वरचं अधिवेशन उद्धव ठाकरेंच्या राजकीय नेतृत्वावर राजमुद्रा उठवणारं ठरलं. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख म्हणून निवड करण्याचा ठराव मांडला आणि अर्थात उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकाडाटात तो मंजूर केला. उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख झाले आणि त्यांची शिवसेनेवरील पकड मजबुत होण्यासही सुरुवात झाली. उद्धव ठाकरेंनी पक्षाची धुरा आपल्या हाती घेतल्यानंतर जराही अस्वस्थ न होता आपल्या पद्धतीनं काम सुरुच ठेवलं. टीम उद्धव उभी करुन त्यांनी शिवसेनेवरील आपली पकड जास्तच मजबूत करत नेली. दरम्यानच्या काळात अनेक संकटे येत गेली परंतु उद्धव ठाकरे अविचल होते, त्यांनी आपल्या सामर्थ्यांनी सर्व संकटे परतावून लावली व शिवसेनेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने वेगाने चालू ठेवली. २००७, २०१२ च्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या प्रचारकाळात उद्धव ठाकरेंनी केलेल्या संघटनात्मक बांधणीमुळे शिवसेनेला बहुमत मिळाले आणि पुन्हा शिवसेनेची महापालिकेत सत्ता स्थापित झाली.  

एकीकडे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला राणे, राज यांच्यानंतरच्या पडझडीतून सावरले. आदित्य ठाकरेंच्या रुपाने एक ताजं रक्त सळसळवलं. आदित्य ठाकरेंना युवासेनेची जबाबदारी देवून शिवसेनेला पुन्हा एकदा झंझावाती वेगात आणण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एक असा आघात झाला...ज्याने साऱ्यांनाच हेलावून सोडलं. १७ नोव्हेंबर २०१२ ला बाळासाहेब गेले. शिवसेनाप्रमुखाचं जाणं शिवसैनिक स्वीकारू शकले नाहीत. साहेब जाऊच कसे शकतात? ते आपल्यासोबतच आहेत, असा टाहो अष्टदिशांमध्ये ऐकू आला. मात्र त्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी स्वत:ला, कुटुंबाला अवघ्या शिवसेनेला सावरलं.

मात्र २०१३ पासून देशात मोदींचा झंझावात उसळला. युतीने विक्रमी यश मिळवले. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी भाजपाने वेगळी वाट निवडली. शिवसेनेला कुणी कमी लेखू नये. अरेला कारे करणारी, मराठी माणसाला भावणाऱ्या शिवसेना स्टाईलमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपाला, अमित शाहांना, नरेंद्र मोदींना अंगावर घेतले आणि मोदींच्या त्सुनामी लाटेला रोखत शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवलं. काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवायचं असल्याचं कारण देत उद्धव ठाकरेंनी विधानसभेत विखारी सामना देणाऱ्या भाजपासोबत सत्तेत भागिदारी स्वीकारली. २०१७ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा वेगळी लढली. अटीतटीच्या लढाईत शिवसेनेने सत्ता राखली. त्याचं कारण उद्धव ठाकरेंमधील बाळासाहेबांच्या वारशाला असावं. 

स्वर्गीय बाळासाहेबांना दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी पुढे २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांना सोबत घेवून महाविकास आघाडी बनवली व शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून सत्ता काबीज केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले व सुशासन काय असते ते त्यांनी गेल्या १० महिन्यांच्या आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतून जगाला दाखवून दिले व त्यामुळेच त्यांना सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून देखील गौरविण्यात आले. महाराष्ट्राची सत्ता सांभाळत असताना, राज्यातील जनतेचा कोरोना पासून बचाव करत असतानाच पक्षातील आपल्या इतर सहकाऱयांच्या व युवानेते आदित्य ठाकरे यांच्या साथीने शिवसेना पक्ष वाढवायचे कार्य देखील मोठया जोमाने चालू ठेवले आहे. त्यामुळे येणाऱ्या ग्राम पंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीत तसेच इतर महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावला जाणार यात शंकाच नाही.

शिवसेना म्हणजे काय? हे महाराष्ट्राने किंवा देशानेच नव्हे तर संपूर्ण जगाने गेल्या ५४ वर्षांत अनुभवले आहे. वादळे आणि वावटळी अनेकदा येतात आणि जातात, पण शिवसेना नावाचे वादळ ५४ वर्षे सतत घोंघावत आहे. शिवसेनेच्या स्थापने पासूनचा इतिहास निदान नव्या पिढीने तरी समजून घेतला पाहिजे. स्थापनेच्या वेळचे जहाल वातावरण आज महाराष्ट्रात नाही. 

ज्या मराठी अस्मितेसाठी शिवसेना स्थापन झाली व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जीवनाच्या ५० वर्षांची आहुती दिली तो त्याग, संघर्ष, चढ-उतार नव्या पिढीने पाहिले नाहीत. पण शिवसेनेने चार पिढय़ा निश्चितच घडवल्या व शिवरायांचा भगवा मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीच्या हाती जात आहे हे महत्त्वाचे. शिवसेनेचा वटवृक्ष आज बहरला आहे. महाराष्ट्रात त्याची पाळेमुळे घट्ट रुजली, फांद्या दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचल्या. शिवसेनेचे सामर्थ्य सत्ता-पदात नसून ते चळवळीत आहे. चळवळ हाच शिवसेनेचा आत्मा आहे. या चळवळी जशा मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान, हिंदूंचा स्वाभिमान यासाठी झाल्या त्यापेक्षा या चळवळी जनतेच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांवर अधिक झाल्या. सुरुवातीच्या काळात महागाई विरोधात लाटणे मोर्चे, पाण्यासाठी हंडा मोर्चे, गहू-तांदूळ, तेलासाठी आंदोलने झाली. ती आंदोलने आता शेतकऱ्याच्या प्रश्नांवर होत आहेत. पण त्याच्या जोडीने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी पाणीवाटप, चारा छावण्या, अन्नछत्रापर्यंत हे समाजकार्य पोहोचले आहे.

भारतामध्ये विविधता एवढी आहे की, कोणताही अखिल भारतीय पक्ष अन्य प्रादेशिक पक्षांची मदत न घेता दीर्घकाळ राज्य करू शकेल, अशी शक्यता नाही. त्यामुळे जर शिवसेनेने सकारात्मक भूमिकेतून मराठी संस्कृती, मराठी भाषा, महाराष्ट्रातील प्रश्न यांच्याबद्दल अभ्यासू व सकारात्मक भूमिका घेऊन काम केले, तर त्या पक्षाला काम करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. उत्साही स्वयंस्फूर्त भावनेने काम करणारा कार्यकर्ता हे शिवसेनेचे बलस्थान आहे व गेल्या काही वर्षांतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण उद्धव ठाकरेंच्या सोबत आहोत, हे त्यांनी दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरे यांचे हे मोठे बलस्थान आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने ते या बलस्थानाचा कसा उपयोग करतात, त्यावर सेनेचे भवितव्य अवलंबून राहील. संघटनात्मक बांधणी, नियोजन यासाठी ओळखले जाणारे उद्धव ठाकरे,  युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या साथीने शिवसेनेला अधिक गतीने पुढे घेऊन जाताना दिसत आहेत शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नपूर्तीकडे. महाराष्ट्रात भविष्यात एकहाती शिवसेनेच्या सत्तेचा भगवा फडकवण्याच्या एकाच लक्ष्याकडे वाटचाल चालू झाली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट