वारंवार जलवाहिनी फुटण्यामुळे भांडुप येथे नवीन जलवाहिनी टाकण्याचा प्रशासनाचा निर्णय!
- by Adarsh Maharashtra
- Sep 28, 2020
- 831 views
मुलुंड :(शेखर भोसले) भांडुप पश्चिम येथील ९०० मिमि व्यासाच्या जलवाहिनीची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली. मात्र जीआरपी मटेरियल पासून बनलेल्या या जलवाहिनीला समांतर लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून त्यासाठी दीड ते दोन वर्षे लागणार आहे. या काळात जुनी जलवाहिनी पुन्हा फुटण्याची शक्यता असल्याने, असे प्रकार सुरु राहिल्यास भांडुपकर नागरिकांना अनेकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
क्वारी रोड आणि प्रतापनगर जंक्शन येथील ९०० मिमि व्यासाची जीआरपी जलवाहिनी सुमारे १८ वर्षांपूर्वी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी मागील वर्षभरात तीन वेळा फुटली. मुंबईतील कुर्ला आणि भांडुप येथे
जीआरपी जलवाहिनी असून ही जलवाहिनी फुटल्यास, दुरुस्तीसाठी नाशिकवरून तंत्रज्ञ बोलवावे लागतात. त्यामुळे दुरुस्तीकामासाठी अधिकचा वेळ जातो. कुर्ला येथील जलवाहिनी अनेकदा फुटल्याने पालिकेने तेथे समांतर लोखंडी जलवाहिनी टाकली आहे. त्याच धर्तीवर भांडुप जलाशयापासून मंगतराम पेट्रोलपंपा पर्यंत लोखंडी जलवाहिनी टाकण्याचे पालिकेने ठरविले आहे. मात्र यासाठी प्रशासकीय प्रक्रिया, कंत्राटदार नेमणे, त्यानंतर कंत्राटदाराने प्रत्यक्षात काम सुरु करण्यापासून पूर्ण करण्यापर्यंतचा कालावधी, या सर्वांसाठी दोन वर्षे जाण्याची शक्यता असल्याने भांडुप ते घाटकोपर मधील रहिवाशांवर पाणी टंचाईची टांगती तलवार राहू शकते.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम