वृत्तपत्रांनी अंकाची किंमत वाढवून, दर्जा सुधारुन स्वावलंबी व्हावे – वसंत मुंडे

संपादकांच्या गोलमेज परिषदेत अंकाची विक्री किंमत वाढविण्यावर एकमत

औरंगाबाद. (विशेष प्रतिनिधी) आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या वर्तमानपत्रांचे अर्थकारण कोरोना महामारीने डबघाईला आले. आता वृत्तपत्रांना आपले पारंपरिक आर्थिक धोरण बदलून आत्मनिर्भर व्हावे लागेल. त्यासाठी वृत्तपत्राच्या अंकाची किंमत वाढवून दर्जा सुधारावा लागेल. तरच वृत्तपत्रांना आर्थिक स्थैर्य मिळेल असे मत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केले. राज्यातील पहिल्या गोलमेज परिषदेत संपादकांनी अंकाची किंमत वाढीच्या भूमिकेचे स्वागत करुन पाठींबा दिला. वर्तमानपत्रांचे पुजन करुन परिषदेचा शुभारंभ करण्यात आला.


यावेळी बोलतांना वसंत मुंडे म्हणाले, वृत्तपत्र कमी किंमतीत देण्याचे धोरण स्वीकारले गेले. अलीकडच्या काळात वृत्तपत्रांची संख्या वाढली आणि खप वाढवून जाहिरात मिळविण्यासाठी कमीत कमी किंमतीत वृत्तपत्रे घरपोहच देण्याची प्रथा सुरू झाली. जाहिरातीचे उत्पन्न कमी झाल्याने आता वृत्तपत्र क्षेत्राला आर्थिक दृष्ट्या वाईट दिवस आले ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पारंपारीक आर्थिक धोरणाची मानसिकता बदलून अंकाची किंमत वाढवणे आणि दर्जेदार वर्तमानपत्र वाचकांच्या हाती देणे ही जबाबदारी संपादक व पत्रकारांना घ्यावी लागेल. तरच वृत्तपत्र आर्थिक पातळीवर सक्षम होतील. पारंपारीक पध्दतीने वृत्तपत्र चालवले तर फार काळ तोट्यात चालवणे शक्य होणार नाही परिणामी विभाग आणि जिल्हास्तरावरची वृत्तपत्रे बंद झाली तर स्थानिक राज्य व्यवस्था निरंकुश होतील व सर्वसामान्य माणसाचा आवाजच बंद होईल. याची जाणीव आता वाचकांना करुन देण्याची वेळ आली आहे. अलीकडच्या काळात वृत्तपत्रांचा कागद, शाई व छपाई खर्च दुपटीने वाढला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तपत्र मात्र 2 ते 5 रुपयात विकले जाते. प्रचंड तोटा सहन करुन हा व्यवसाय करावा लागतो. मधल्या काळात अनेक राजकारणी व्यक्ती, उद्योजक व भांडवलदारांनी आपल्या वेगवेगळ्या फायद्यासाठी वर्तमानपत्र काढले. मात्र या क्षेत्राला स्थेर्य मिळवून देण्याची भूमिका कुणीही घेतली नाही. ती भूमिका आता आपल्या सर्वांना घ्यावी लागेल असेही मुंडे यांनी सांगितले.

संपादक धनंजय लांबे म्हणाले, आर्थिक गणित बिघडले की त्याचा दैनिक मराठवाडा होता. त्यामुळे वृत्तपत्रांच्या आर्थिक धोरणात बदल करण्यासाठी आता वृत्तपत्र मालकांना या मोहिमेत सहभागी करून घ्यावे लागेल. तर संपादक दयानंद माने यांनी वृत्तवाहिन्या आणि समाज माध्यमांच्या भूमिकेने वृत्तपत्रांच्या खपावर दुरगामी परिणाम झाला आहे. डिजिटल माध्यमांकडे डोळसपणे पाहुन बदलत्या परिस्थितीत वृत्तपत्र  टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने आणि नवीन धोरणाने काम करावे लागणार आहे. तर कल्याण पांडे यांनी वृत्तपत्रांचे आर्थिक गणित अत्यंत सोप्या पध्दतीत मांडले. संपादक रविंद्र तहकीक यांनी माध्यम क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी एका पत्रकाराला विधान परिषदेवर नियुक्त करावे. त्याचबरोबर वृत्तपत्रांनी किंमत वाढवून समाजामध्ये आपली पत निर्माण करावी असे आवाहन केले. यावेळी निमंत्रक प्रा.डॉ.प्रभू गोरे यांनी परिषदेची भूमिका मांडताना आतापर्यंत वृत्तपत्रांनी समाजाच्या सर्व घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली. मात्र आता वृत्तपत्रच अडचणीत आल्याने सर्वांनी एकत्र येऊन या क्षेत्राला सक्षम करण्यासाठी निर्णय घ्यावा लागेल. आता आपल्यासाठी एकत्र येण्यासाठी ही परिषद असल्याचे सांगितले. तर पत्रकार संघाचे महानगर अध्यक्ष अनिल सावंत यांनी वृत्तपत्रांसाठी कठीण काळात किंमत वाढवणे हा पर्याय योग्य असल्याचे सांगुन एकत्रितपणे निर्णय घेण्याचे आवाहन केले.

परिषदेत वृत्तपत्रांनी अंकाची किंमत वाढवून, दर्जा सुधारुन स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा. शासनाने वृत्तपत्रांना कागद व शाई सवलतीच्या दरात उपलब्ध करुन द्यावीत. वस्तु आणि सेवा करातुन सुट द्यावी. कोरोना संकटात कर्मचारी व पगार कपातीबाबत वृत्तपत्रांच्या मालकांना परावृत्त करावे. वृत्तपत्र क्षेत्राला लघू उद्योगाचा दर्जा द्यावा. शासनाच्या जास्तीत जास्त जाहिराती विभागीय व जिल्हा दैनिकांना देण्याचे एबीसीला बंधनकारक करावे. कोरोना काळात शहीद झालेल्या पत्रकारांना घोषणा केल्याप्रमाणे पन्नास लाख रुपयांच्या विमा कवच अंतर्गत मदत करावी. घरकुल व आरोग्य विमा योजनेची योग्य पध्दतीने अंमलबजावणी करुन पत्रकारांना आधार द्यावा आदी मागण्यांचे ठराव गोलमेज परिषदेत संमत करण्यात आले.

परिषदेला मेट्रो न्यूज चे संपादक मकरंद घोडके, अहमदनगर घडामोडीचे संपादक मनोज मोतीयानी, नगर स्वतंत्र चे संपादक सुभाष चिंध्ये व कार्यकारी संपादक सुभाष मुदळ, लाभवार्ता चे संपादक मनोज पाटणी, दै. बदलता महाराष्ट्र चे संपादक विष्णू कदम, दै. राज्यवार्ता चे संपादक भरत मानकर, लाईव्ह महाराष्ट्रचे कृष्णा लोखंडे, वृत्त टाईम्सचे संपादक कल्याण अन्नपूर्णे, मनोज पाटणी, बहुजन हितायचे बबन सोनवणे, पब्लिक शासनचे प्रशांत पाटील, निळे प्रतिकचे संपादक रतनकुमार साळवे, आकाश सपकाळ, जगन्नाथ सुपेकर, दै. सत्यनितीचे संपादक देविदास कोळेकर, पोलिस न्यूजचे संपादक कृष्णा कोल्हे, अशोक वानखेडे, रमाकांत कुलकर्णी, अभिजित हिरप, पुण्यनगरीचे डॉ. शेषराव पठाडे, दै. महानगरीचे अशोक देढे, लातूर पॅटर्नचे गोविंद काळे आदी उपस्थित होते. परिषदेच्या यशस्वीतेसाठी सचिव दिपक मस्के, संघटक विलास शिंगी, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, प्रसिद्धी प्रमुख जॉन भालेराव, सरचिटणीस शिवाजी गायकवाड, महानगर उपाध्यक्ष हनुमंत कोल्हे,  बी.आर.इव्हेंट्स चे ऋषिकेश राऊत, अभिषेक राऊत आदींनी परिश्रम घेतले. प्रारंभी कोरोना काळात शाहिद झालेले पत्रकार व वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. परिषदेचे निमंत्रक प्रा. डॉ. प्रभू गोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत यांनी विविध ठरावांचे वाचन केले. प्रसिद्ध प्रमूख सचिन अंभोरे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा उपाध्यक्ष छबुराव ताके यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट