पतीचे कोरोनाने निधन , पतीचा विरह सहन न झाल्याने पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
- by Reporter
- Sep 18, 2020
- 579 views
भोसरी,पुणे (प्रतिनिधी) : दोन महिन्यांपूर्वी पतीचे कोरोनामुळे निधन झाले. पतीचा विरह सहन न झाल्याने बरोबर दोन महिन्यांनी पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवारी, दि.१८) सकाळी फुलेनगर, भोसरी येथे उघडकीस आली. पती-पत्नीच्या जाण्याने त्यांची दोन्ही मुले आई-वडिलांच्या मायेला पोरकी झाली आहेत.
गोदावरी गुरुबसप्पा खजुरकर (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. गोदावरी यांचे पती गुरुबसप्पा उर्फ प्रकास खजुरकर (वय ३५) यांचे दोन महिन्यांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले आहे.
जुलै महिन्यात गुरूबसप्पा यांना कोरोनाचा संसर्ग झाला.उपचारादरम्यान १८ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला.गुरुबसप्पा हे टिव्ही फिटींग आणि इंस्टॉलेशनचे काम करीत होते. त्यांना ११ वर्षांचा एक मुलगा आणि ७ वर्षांची एक मुलगी आहे.
गुरूबसप्पा यांच्यावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. तर पत्नी गोदावरी या देखील काही कामे करून त्यांना हातभार लावत होत्या. पती गुरूबसप्पा यांच्या मृत्यूनंतर पुढे काय होणार, याचा यक्षप्रश्न गोदावरी यांच्या समोर उभा राहिला. त्यातच पतीचा विरह सहन न झाल्याने त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
पती गुरूबसप्पा आणि पत्नी गोदावरी या दोघांच्या जाण्याने त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. दोन्ही मुले आई-वडिलांच्या मायेला पोरकी झाली आहेत. घरात वृद्ध आई आणि बहीण, भाऊ असे तिघेजण आहेत.
शिवसेनेने घेतली मुलांच्या शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी
दरम्यान, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी या दोन्ही मुलांचा पुढील सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे. तर याच परिसरातील माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी या दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे
रिपोर्टर