
ऐतिहासिक पुणे कराराच्याच दिवशी खाजगिकरणाविरोधात भिम आर्मी आणि आझाद समाज पार्टी राष्ट्रपतींना पाठवणार हजारो निवेदने.
- by Reporter
- Sep 17, 2020
- 1571 views
मुंबई (प्रतिनिधी) : सरकारी क्षेत्रात सातत्याने होत असणाऱ्या खाजगिकरणाविरोधात आणि इतर खाजगी क्षेत्रांत आरक्षण देण्यात यावे ह्या मागणीसाठी २४ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात भिम आर्मी आणि आझाद समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भारताच्या सन्माननीय राष्ट्रपतींना हजारोंच्या संख्येने निवेदने देण्यात येऊन आपला विरोध दर्शविण्यात येणार असल्याची माहिती भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
२४ सप्टेंबर १९३२ रोजी पुणे इथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि म.गांधी यांच्यात ऐतिहासिक करार झाला ,जो इतिहासात पुणे करार म्हणून प्रसिध्द आहे.ह्या पुणे करारानुसार भारतीय दलित-शोषित-वंचित समाजासाठी बाबासाहेबांनी राजकीय-शैक्षणिक-नोकरीत आरक्षण मिळवून ह्या पीडित समाजाला अधिकार मिळवून दिले.परंतु आज त्याच सरकारी संस्थेचे मोठ्या प्रमाणात
खाजगीकरण मोदी सरकार करीत असून ते एक प्रकारे आरक्षण संपविण्याचाच डाव आहे.एकीकडे मोदी आंबेडकर-गांधी यांना पुज्यनिय मानत असल्याचे जगाला सांगत असताना दुसरीकडे मात्र त्याच
आंबेडकर-गांधी यांच्यातील झालेल्या पुणे करारालाच नाकारत आहेत की काय ? अशी रास्त शंका येऊ लागलेली आहे.जर सरकारी संस्थाच शिल्लक रहाणार नसतील , त्या खाजगी व्यक्तींच्या हातात जात असतील तर आरक्षण जिवंत कुठे रहाणार ? म्हणूनच भिम आर्मीचे संस्थापक प्रमुख आणि आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष , संविधान रक्षक भाई चंद्रशेखर आझाद रावण यांच्या आदेशानुसार आणि भिम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्मवीर भाई विनय रतन सिंह यांच्या निर्देशानुसार ह्याच ऐतिहासिक पुणे कराराच्या ८८ व्या वर्षपूर्तीनिमित्त संपूर्ण देशभरातून भिम आर्मी आणि आझाद समाज पक्षाचे जिल्हा पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रपती महोदयांना निवेदने देऊन ह्या
खाजगिकरणाविरोधात आपला संताप व्यक्त करणार असल्याची माहिती सुद्धा भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातसुद्धा सर्व जिल्ह्यांतून राष्ट्रपतींना मोठ्या प्रमाणात निवेदने पाठविण्यात येणार असून तश्या सूचना भिम आर्मीचे केंद्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे , राज्य कोअर कमिटी प्रमुख मा.राजूभाई झनके , राज्यप्रमुख मा.नेहाताई शिंदे आणि मुख्य महासचिव मा.मनिषभाऊ साठे यांनी भिम आर्मी व आझाद समाज पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना दिल्या असल्याची माहिती सुद्धा भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.
रिपोर्टर