अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या ८० वर्षांनिमित्त कीर्तन परंपरा नव्या पिढीत रुजविण्याचा निर्धार
- by Adarsh Maharashtra
- Sep 16, 2020
- 1509 views
मुंबई: अखिल भारतीय कीर्तन संस्था या देश-विदेशात लौकिक असलेल्या दादर येथील संस्थेला ८० वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने विविध उपक्रमांबरोबरच कीर्तन परंपरा आधुनिक काळातील नव्या पिढीत रुजवण्याचा निर्धार संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. वर्षभराच्या काळात सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रमांची नांदी असेल, असे अध्यक्ष सुरेश उपाध्ये जाहीर केले आहे.
नारदीय कीर्तनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन नवीन कीर्तनकार तयार करण्यासाठी १९४० साली श्रावण वद्य पंचमीला या संस्थेची स्थापना द. ल. वैद्य मार्ग. दादर येथें करण्यात आली. संस्थेचे आद्य संस्थापक शंकरराव ब. कुलकर्णी आणि हरि भक्ती परायण गो. ग. भोसेकर बुवा हे आहेत. त्यावेळचे कीर्तनकार बुवा खासगीरीत्या गुरु-शिष्य परंपरेने शिकवीत असत. कीर्तनाची पाठशाला कीर्तनकार घरीच चालवीत. त्यामुळे कीर्तनाची अशा प्रकारची शाळा ही कल्पनाचं मुळी समाजात नव्याने अवतरली. २००० साली संस्थेच्या वास्तूचे पुनर्निर्माण आणि विस्तार कार्य तत्कालीन अध्यक्ष सुरेश उपाध्ये आणि सरकार्यवाह किशोर साठे यांच्या प्रयत्नाने साकारले गेले. २००१ मध्ये कीर्तन विद्यालयाचे नामकरण `साई सत्चरीत्रकार हेमाडपंत कीर्तन विद्यालय' असे करण्यात आले.
पत्रव्यवहाराने कीर्तन शिकविण्याचा अभिनव उपक्रम २००७ पासून सुरु झाला. त्यासाठी एक खास दूरस्थ अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती ठरविण्यात आली. नारदीय कीर्तनाचे आता ऑनलाईन वर्ग देखील सुरू करण्यात आले आहेत, आठवड्यातून दोन वेळा हे वर्ग असून घर बसल्या कीर्तन शिकणे सोपे झाले आहे. ८ ते ७० वर्षांपर्यंत कुणीही यात सहभागी होऊ शकतो. तसेच या ठिकाणी ६० वर्षांहून अधिक काळ ज्ञानेश्वरी आणि दासबोध पारायणे नियमितपणे होतात. दैनंदिन, कीर्तन, संस्कार वर्ग, महिला भजन, पौरोहित्य, दासबोध व्याख्याने, चर्चा, सत्संग, भजन वर्ग, सुगम संगीत तसेच अन्य उपक्रमांचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात येते. त्याशिवाय कीर्तन शिबीर, कीर्तन संमेलन, महिला कीर्तन महोत्सव, युवा कीर्तन महोत्सव, कीर्तनकार पुरस्कार योजना, कीर्तनकार सहाय्य निधी, बाल किर्तनकार महोत्सव आदी उपक्रमदेखील राबविण्यात येतात. संस्थेचे विद्यार्थ्यांना पूरक असे तसेच धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक विषयांवरील अनेक दुर्मिळ ग्रंथांचे ग्रंथालय आहे. संस्थेचे स्वतःचे विट्ठल मंदिर, कीर्तन शाळा आणि सुसज्ज सभागृह आहे.
संस्थेचे संकेतस्थळ www.keertansanstha.in हे असून अधिक माहितीसाठी ०२२-२४३२१४७४ या क्रमांकावर संपर्क करणे सोयीचे आहे. संस्थेच्या विश्वस्त मंडळावर रविंद्र आवटी, शशिकांत पाटील, मधुकर पेंडसे, प्रभाकर फणसे, वसंत हरयान हे मान्यवर तर कार्यकारी मंडळावर अध्यक्ष सुरेश उपाध्ये, उपाध्यक्ष सुभाष कर्वे, सरकार्यवाह किशोर साठे, विठ्ठल परब, माधव खरे हे पदाधिकारी तसेच सविता भट, मंदार हर्डीकर, शुभदा लिमये हे मान्यवर कार्यरत आहेत.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम