
राज्यातील सरपंचांच्या ऑनलाईन मेळाव्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे उद्घाटन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कुटुंबप्रमुख म्हणून घराघरात जनजागृती करण्याचे सरपंचांना आवाहन
- by Adarsh Maharashtra
- Sep 15, 2020
- 2059 views
मुंबई दि १५: माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही अशी मोहीम आहे जिथे आपण कोरोनावर आक्रमण करून त्याला रोखणार आहोत त्यामुळे प्रत्येक सरपंचाने एका कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेतून आपापल्या गावांमध्ये जबाबदारीने ही मोहीम राबवावी परिवारांना आरोग्यसंपन्न करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
आज मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आयोजित एका ऑनलाईन मेळाव्यात राज्यातील सरपंचाना संबोधित केले व या मोहिमेचे उद्घाटनही केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार मुख्य सचिव संजय कुमार, ग्रामविकास अपर मुख्य सचिव अरविंद कुमार,सहभागी झाले होते. या वेब मेळाव्यास राज्यातील सुमारे २८ हजार सरपंचांची उपस्थिती होती.
या मोहिमेस ऐतिहासिक मोहीम असे संबोधून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, कोरोना विरुद्ध आक्रमकपणे लढून महाराष्ट्र देशाला एक दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही. सरपंचानी आपापल्या गावातील लोक हे मास्क घालताहेत का, सुरक्षित अंतराचे पालन करत आहेत का,हात धुणे वगैरे स्वच्छता पाळताहेत का अशा गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवावे व हे नियम पाळण्यास लोकांना बाध्य करावे. गावकरी हे सरपंचांचे ऐकतात, विशेषत: या कोरोना साथीमध्ये गावोगावी सरपंचांनी प्रयत्नपूर्वक कोरोनाला आपल्या गावात येऊ देण्यापासून रोखले आहे.
ही लोकांची चळवळ करा
आजपर्यंत गेल्या ६ महिन्यांत कोरोनाविरुद्ध आम्ही लढतो आहोत पण ही लढाई आता एकांगी राहणार नाही तर सर्वसामान्य लोक, नागरिक यांना सहभागी करून घेऊन ही लोकचळवळ करा असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, एका महिन्यात आपल्याला प्रत्येक घरी दोनदा भेट द्यायची आहे. यासाठी असलेली पथके सर्व घरी व्यवस्थित भेटी देतील याची जबाबदारी सरपंचांनी घ्यावी. लॉकडाऊननंतर आपण सर्व काही सुरळीत सुरु करीत असून सणवार येत आहेत. सर्वधर्मियांनी संयम पाळून ते साजरे केले आहेत. पण तरी देखील मधल्या काळात परत एकदा कोरोना साथीचा संसर्ग वाढला असून आता आपल्याला त्याचा फैलाव थांबविण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.
नवीन जीवनशैलीची ओळख करून द्या
कोरोनाची जगभर दुसरी लाट आली आहे असे म्हणतात. इस्त्रायलने परत एकदा लॉकडाऊन जाहीर केले आहे. काही देशांनी कायदे कडकरित्या राबवण्यास सुरुवात केली आहे. नियम पळणार नाहीत त्यांना मोठा दंड भरावा लागतो. पण स्वत:हून आपण नियम पाळणे हे कधीही चांगले. आपल्याला नवीन जीवनशैली आणावी लागणार आहे. ही मोहीम त्याचीच सुरुवात आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मोहीम महत्वाकांक्षी - उपमुख्यमंत्री
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात यापूर्वी मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. स्व.आर.आर.पाटील यांच्या काळात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता, तंटामुक्त चळवळ, हागणदारीमुक्त चळवळ अशा मोहिमांप्रमाणे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम यशस्वी करा असे ते म्हणाले.
यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, पूर्वीच्या काळी साथ रोग आले की गावातील लोक शेतांवर जायचे, ते एकप्रकारे विलगीकरणच असायचे. आताही आपण आरोग्याचे काही नियम पाळले तर कोरोनाची साथ रोखू शकू.
सरपंचांकडून स्वागत
याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात ६ सरपंचांनी मनोगते व्यक्त केली. कोल्हापूर जिल्ह्यातील फराकटेवाडी येथील सरपंच शीतल फराकटे, रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगावच्या श्रद्धा मोरे, नाशिक जिल्ह्यातील कोटमगावाचे सरपंच बाळासाहेब म्हस्के, नागपूर जिल्ह्यातील कढोळीच्या सरपंच प्रांजली वाघ, अमरावती जिल्ह्यातील बोरला आदिवासी गावाचे सरपंच संजय भास्कर, औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील सरपंच विलास शिंदे यांनी या मोहिमेची कशी तयारी केली आहे ते सविस्तर सांगितले आणि ती पूर्णपणे यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी मोहिमेची माहिती देणाऱ्या आरोग्य विभागाच्या माहिती पुस्तिका, प्रसिद्धी साहित्याचे देखील प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे डॉ सतीश पवार , ग्रामविकास उपसचिव प्रवीण जैन आदींची उपस्थिती होती.
अशी असणार मोहीम
कोरोना विषाणुला रोखण्यासाठी मोहीम. आशा स्वयंसेविका, वैद्यकीय सहायक, गट प्रवर्तक, आणि एकूणच या क्षेत्रातील सर्वांच्या सहभागाने एक राज्यव्यापी मोठी मोहीम.
यात पहिल्या टप्प्यात आजपासून १० ऑक्टोबरपर्यंत घरोघर आरोग्य सर्वेक्षण केले जाईल.
दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार.
पहिला फेरीचा कालावधी २२ दिवसांचा तर दुसरा १२ दिवसांचा असेल.
यात घरातील कुटुंबांच्या आरोग्याविषयी जाणून घेतले जाईल, त्यांना इतर कोणते आजार आहेत का? हाय रिस्क गटातील वयस्क, यांना असलेले आजार ? हृदयविकार, मधुमेह, किडणी, लठ्ठपणा यासारख्या आजार असणाऱ्या व्यक्ती शोधण्यात येतील. या व अनुषंगाने इतर आरोग्य विषयक माहिती विचारण्यात येणार आहे.
ही मोहीम महानगरपालिका, नगरपालिका नगरपंचायत, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी राबविली जाऊन गावे, वाडी, पाडे येथील प्रत्येक नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येईल.
महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भागामध्ये तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र याचे नियोजन करतील.
दोन कर्मचाऱ्यांचे / स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देईल. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. हे स्वयंसेवक सरपंच, नगरसेवक यांनी निश्चित करावयाचे आहे. ही लोकांची मोहीम राहणार आहे. यात सरपंच, नगरसेवक यांच्यावरही जबाबदारी असेल.
मोहीम सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्या मार्फत चालविली जाईल.
आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी,पालक, सामान्य व्यक्तींसाठी निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्यांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत. विविध संस्थांसाठी ही बक्षीस योजना राबविण्यात येईल.
जिल्हा स्तरावर नागरी आणि ग्रामीण असे दोन विभाग असतील. प्रत्येक विभागात पहिल्या तीन संस्था निवडण्यात येऊन त्यांना गुणांच्या आधारे बक्षीस दिले जाईल.
विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्ती यांना देखील बक्षीसे देण्यात येतील.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम