मनसेच्या पाठपुराव्यामुळे एलबीएस मार्गावरील विजेचे दिवे लागले

मुलुंड (शेखर भोसले) : एलबीएस मार्गावरील गांधीनगर ते भांडुपच्या मंगतराम पेट्रोल पंपापर्यंतच्या रस्त्यावरील दिवे मागील काही दिवसांपासून बंद होते. गणेशोत्सव काळात देखील या रस्त्यावरील दिवे बंद असल्याने सर्वत्र काळोख होत होता त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना या अंधारात प्रवास करावा लागत होता तसेच पादचाऱयांना देखील जीव मुठीत घेवून काळोखात रस्ता ओलांडावा लागत होता त्यामुळे त्रासलेल्या नागरिकांनी सदर बाबीची तक्रार मनसेच्या रस्ते, साधन-सुविधा व आस्थापनाचे प्रभाग संघटक संतोष पार्टे यांच्याकडे केली. तक्रार मिळताच संतोष पार्टे व त्यांचे साथीदार जयेश परब, वैभव काते व संदीप पंतकोल यांनी मेट्रोच्या कामाचे कंत्राटदार रिलायन्सला लेखी निवेदन देवून या मार्गावरील विजेच्या खांबावरील दिवे तात्काळ सुरु करण्याची विनंती केली.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रिलायन्सच्या अधिकाऱयांची भेट घेवून सततचा पाठपुरावा केल्याने रिलायन्सने गांधीनगर ते भांडुपच्या मंगतराम पेट्रोल पंपापर्यंतच्या रस्त्यावरील सर्व बंद दिवे दुरुस्त करून रस्त्यावरील काळोख दूर केला. मार्गावरील दिवे सुरु झाल्याने पादचाऱयांनी व वाहनचालकांनी देखील समाधान व्यक्त केले असून तातडीने या समस्येकडे लक्ष घातल्याबद्दल मनसे पदाधिकारी संतोष पार्टे व इतरांचे आभार मानले आहे.

संबंधित पोस्ट