
राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा जिल्ह्यांनी आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदवावी राजेंद्र शिंगणे
- by Reporter
- Sep 14, 2020
- 393 views
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदवावी त्यादृष्टीने नियोजन करुन ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिले. अन्न व औषध प्रशासन आयुक्तालय येथे ऑक्सिजन तयार करणारे उत्पादक, पुरवठादार आणि वाहतुकदार यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.
कोविड १९ च्या रुग्णांवर उपचारासाठी लागणारे ऑक्सिजन पुरवठा करताना आवश्यक असणारी यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित रहावी यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन श्री.शिंगणे यांनी यावेळी केले. श्री.शिंगणे म्हणाले, राज्यातील ११ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता पडते आहे. ५०० मेट्रिक टन उपलब्धता आहे तर सध्या एक हजार टनपेक्षा जास्त ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. सर्व पुरवठादार आणि वाहतुकदार यांनी आपले वितरणाचे जाळे वाढवुन योग्य सहकार्य करुन गरजुंपर्यंत ऑक्सिजन पोहचेल याची खबरदारी घ्यावी. या कामात काही अडचण असल्यास शासनातर्फे अडचण दूर करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
ऑक्सिजन पुरवठ्यासह मास्कच्या किंमती, सॅनिटायझरची उपलब्धता, रेमडेसविर आणि इतर औषधे तसेच खासगी डॉक्टरांकडे उपलब्ध असलेला ऑक्सिजनचा साठा याचाही श्री. शिंगणे यांनी सविस्तर आढावा घेतला.
नियंत्रणासाठी विशेष कंट्रोल रुम
कोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसाठी अन्न व औषध पुरवठा विभागाने विशेष कंट्रोल रुम स्थापन केली आहे. राज्यात कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सिजनची आवश्यकता असल्यास त्या जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक हे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत आपली मागणी नोंदवितात.जवळच्या पुरवठादाराकडून ऑक्सिजन तातडीने त्या जिल्ह्याला उपलब्ध करुन दिले जाते. या कंट्रोल रुममध्ये अन्न व औषध प्रशासन विभागासह आरोग्य विभाग आणि उद्योग विभागाचे संबधित अधिकारी समन्वय साधत असतात. यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ तसेच ०२२-२६५९२३६४ हा लॅण्डलाईन क्रमांक कार्यान्वित आहे.
या वेळी अन्न व औषध प्रशासन सचिव विजय सौरभ, आयुक्त अरुण उन्हाळे, आरोग्य विभागाचे आयुक्त रामास्वामी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर