
मनसेच्या खड्डे भ्रमंतीला भांडुपकर नागरिकांचा भरघोस प्रतिसाद
- by Reporter
- Sep 14, 2020
- 930 views
मुलुंड (शेखर भोसले) : एस वॉर्डच्या कक्षेत येणार्या भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, पवई येथील प्रभाग क्र १०९ ते १२२ या प्रभागात रस्त्यांवर प्रचंड खड्डे निर्माण झाले आहेत तर काही रस्ते पूर्णतः उखडले गेले असल्याने
वाहनचालकांना व पादचाऱयांना भयंकर त्रास होत असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालिका प्रशासन रस्त्यांवरील या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मनसेच्या रस्ते, साधन सुविधा व आस्थापनांचे प्रभाग संघटक संतोष पार्टे यांच्यावतीने खड्डे भ्रमंती आंदोलन हाती घेण्यात आले होते. या आंदोलनाला रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो पाठवून स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची जाणीव करून देण्यासाठी व एस वॉर्डमधील संबंधित अधिकाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी नागरिकांमध्ये या निमित्ताने जनजागृती मोहीम राबविण्यात आली व आपला परिसर स्वच्छ व सुंदर पाहिजे असेल तर परिसरातील रस्ते प्रथम दर्जेदार असले पाहिजेत हे नागरिकांच्या लक्षात आणून देण्यात आले व त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले होते. पालिका प्रशासनाचे व स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी जागृत नागरिकांनी आपल्या प्रभागातील खड्ड्यांचे फोटो व्हाट्सअपच्या माध्यमातून पाठवावेत. या खड्ड्यांची पालिकेच्या एस विभागाकडून आम्ही योग्य पद्धतीने दुरुस्ती करून घेऊ, असे मनसेच्या रस्ते, साधन सुविधा व आस्थापनांचे प्रभाग संघटक संतोष पार्टे यांनी नागरिकांना आवाहन केले होते.
या अनोख्या खड्डे भ्रमंती आंदोलनाला एस वार्डातील नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अनेक जागरूक नागरिकांनी आपल्या प्रभागातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो पाठविण्यात सुरुवात केली आहे.
रिपोर्टर