महानगर गॅसच्या वाढीव बिलाविरोधात धडक मोर्चा

मुलुंड (शेखर भोसले) : महानगर गॅस कंपनीने ग्राहकांना पाठवलेल्या वाढीव बिलाच्या विरोधात शिवसेना शाखा क्र १०६, मुलुंड पूर्वच्या वतीने महानगर गॅसच्या मुलुंड पूर्व येथील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन सोमवार दि १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान करण्यात आले होते. शिवसेना शाखा क्र १०६, स्टेशन रोड येथून महानगर गॅसच्या वाढीव बिलाच्या विरोधात घोषणा देत निघालेला हा मोर्चा दुपारी १२ वाजता राजे संभाजी मैदान जवळील महानगर गॅसच्या कार्यालयावर  धडकला.

महानगर गॅस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी या मोर्च्याला सामोरे जात शिवसेना शाखाप्रमुख अमोल संसारे व इतर वरिष्ठ पदाधिकाऱयांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत मोर्चेकऱयांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महानगर गॅसच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी मुलुंड पूर्व कडील ग्राहकांच्या गॅस मिटरचे पुन्हा एकदा रिडींग घेवून ग्राहकांना सुधारित बिल पाठवले जाईल व ज्यांनी अतिरिक्त बिल पेमेंट केले असेल त्यांच्या बिलात अतिरिक्त रक्कम जमा करून दिली जाईल तसेच ज्यांनी अद्याप बिल पेमेंट केले नसेल त्यांनी नवीन सुधारित बिल आल्यानंतर बिल पेमेंट करावे व अश्या ग्राहकांना कोणताही लेट पेमेंट चार्ज लावला जाणार नाही असे आश्वासन शिवसेना पदाधिकाऱयांना व मोर्चेकऱयांना यावेळी देण्यात आले. तसेच ग्राहकांच्या तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी महानगर गॅसचा एक जनसंपर्क प्रतिनिधी कायम स्वरूपी मुलुंड पूर्व येथील कार्यालयात बसविण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱयांनी यावेळी दिले.  

संबंधित पोस्ट