
नको त्या गोष्टींचे भांडवल करणाऱ्या राजकरण्यांपासून जनतेने सावध रहावे
- by Reporter
- Sep 14, 2020
- 1287 views
मुंबई (प्रतिनिधी) : प्रसार माध्यमांचे काम नैतिक जबाबदारीबरोबर समाज प्रबोधनाचे असते,परंतु सद्या प्रसार माध्यमे सनसनीखेज बातम्यांच्या मागे लागून प्रेक्षकांच्या माथी नसत्या गोष्टी मारतात.त्यातच राजकारणी सामान्यांच्या भावनेशी खेळण्याची संधी शोधतच असतात.आणि त्यातून पोरखेळ होतो.आज भाषिक,प्रांतिय व प्रादेशिक वाद निर्माण करून सत्ता कशी मिळवता येईल याचाच विचार होतो.त्याकरता मृत व्यक्तीसही वेळप्रसंगी वेठीस धरले जाते वाद निर्माण केले जातात ही गंभीर बाब म्हटली
पाहिजे.राजकारण्यांच्या फुकटच्या आरडाओरडीकडे सर्वसामान्यांनी लक्ष न देणे ही काळाची गरज आहे असे मत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडून सन्मानित दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केले
राज्यात सद्या सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण गाजत आहे. रिया चक्रवर्ती गाजत आहे त्यातच कंगणा राणवत प्रकरणाने उचल खाल्ली. निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या मारहाणीचे प्रकरण आले.काहीही वेडेवाकडे करायचे उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली की, राज्यात राष्ट्रपती राजवट लावा अशी हाकाटी पिटायची हा एक कलमी कार्यक्रम सद्या पहायला मिळत आहे. काही राजकारणी अशा गोष्टींच्या पाठीशी उभे राहून प्रसिद्धी माध्यमांच्या सहाय्याने प्रसिद्धी स्टंट करीत आहेत. सुशांतने आत्महत्या केली काय?रिया जेलमध्ये गेली काय?कंगणाचे कार्यालय तोडले काय आणि मदन शर्मांना मारहाण झाली काय?याचे सोयरसुतक तसे कोणालाच नाही. आज राज्यात पूर,वादळ,शेतकरी-विद्यार्थी आत्महत्या, दुष्काळाचे सावट,जुन्या इमारतींच्या पुर्नविकासाचा प्रश्न,वाढती बेकारी, पोलीस-गिरणी कामगार-शासकीय कर्मचारी यांच्या घराची समस्या, चीनच्या सीमेवर,पाकिस्तानच्या सीमेवर शहीद होणारे भारतीय जवान त्यातच कोरोनाचे संकट या विषयी बोलण्यास कोणीच तयार नाही. पण पालघर येथील दुर्देवी साधू हत्येचे भांडवल केले जात आहे. मुंबईस, मुंबई पोलीस, राज्याचे मुख्यमंत्री यांच्या बाबत अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्यांना डोक्यावर घेतले जाते बिहार,उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आदी राज्यात माजी सैनिकांवर हल्ले झाले,पुज्याऱ्यांचे खून झाले,विवाहित महिलेवर
सामुदायिक बलात्कार झाला.मिडियाने याची किती दखल घेतली. त्या त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी व महाराष्ट्रात गळे काढणाऱ्या नेत्यांनी राष्ट्रीय पातळीवर किती चर्चा केली भयंकर अन्याय झालेल्यांना, दहशतीखाली असणाऱ्यांना किती सुरक्षा पुरविली गेली. नको त्या घटनेचे राजकीय भांडवल करणारे याबाबत गप्प का?असा संताप दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केला.
रिपोर्टर