पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील डहाणू ,पालघर तालुक्यातील बडा पोखरण, केळवे-माहीम, उंबरपाडा नंदाळे परिसरातील गावांना होणार फायदा
- by Reporter
- Sep 09, 2020
- 424 views
मुंबई (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील बडा पोखरण, धाकटी डहाणू परिसरातील ३० गावे, केळवे-माहीम परिसरातील २० गावे उंबरपाडा व नंदाळे परिसरातील ३२ गावे अशा एकूण ८२ गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांची आखणी करून तातडीने कामांना गती द्यावी असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नळ पाणीपुरवठा योजना संदर्भात आज मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
बडा पोखरण व २९ गावे ग्रामीण पाणीपुरवठा योजना
बडा पोखरण २९ गावे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे काम ९०% पूर्ण झाले आहे. सतत फुटणाऱ्या जलवाहिनीमुळे तसेच देखभाल व दुरुस्ती अभावी शेवटच्या टोकाकडील गावांना पाणीपुरवठा होत नाही.
देखभाल व दुरुस्तीसाठी ही योजना जिल्हा परिषद, पालघर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावी असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले .धाकटी डहाणू गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी चंडी गावापासून स्वतंत्र पाईपलाईन किंवा डहाणू नगरपालिकेच्या जलवाहिनीतून पाईप लाईन टाकणे यापैकी एका पर्यायाची निवड करून त्याचा जल जीवन मिशन मध्ये समाविष्ट करावा असे निर्देशही पाणीपुरवठा मंत्र्यांनी यावेळी दिले.
केळवे-माहीम व १८ गावे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना
केळवे-माहीम व १८ गावे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत सध्या पाणी पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे तसेच जलवाहिन्या तसेच कमी क्षमतेच्या वितरण वाहिन्यांमुळे पुरेसे पाणी मिळण्यास अडचणी येत आहेत.
या पार्श्वभूमीवर नवीन जल जीवन मिशनच्या धोरणानुसार केळवे-माहीम प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अंदाजपत्रक व आराखडे दरडोई ५५ लिटरप्रमाणे तयार करून एक महिन्याच्या आत प्रस्ताव सादर करावा असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
वाढीव उंबरपाडा नंदाडे व ३२ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना
पालघर जिल्ह्यातील उंबरपाडा नंदाडे व १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना संयुक्त समितीमार्फत राबविण्यात येत आहे.ही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी खासदार राजेंद्र गावित यांनी यावेळी केली. करवाळे धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने फेब्रुवारी व मार्च महिन्यात अपुरा पाणीपुरवठा होतो. तसेच या भागातील लोकसंख्येचे नागरीकरण झपाट्याने वाढत असल्यामुळे नवीन योजनेची आवश्यकता होती. त्यामुळे खडकोली बंधाऱ्यातून जल जीवन मिशनमध्ये नवीन योजनेची आखणी करून प्रस्ताव सादर करावा असे निर्देश पाणीपुरवठामंत्री श्री. पाटील यांनी दिले.
मोखाडा तालुक्यातील चास आणि गोमघर पाणीपुरवठा योजनेची कामे बंद आहेत. ती त्वरित सुरू करण्याचे निर्देशही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा, राजेशभाई शहा, सुभाष भुजबळ ,मुख्य अभियंता ,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते
रिपोर्टर