जातीयवादी राक्षस महाराष्ट्राच्या भूमीत भिम आर्मी गाडल्याशिवाय रहाणार नाही. अशोकभाऊ कांबळे व नेहाताई शिंदे यांनी दिला इशारा.

औरंगाबाद (प्रतिनिधी) : गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना नामक विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातलेला असताना सुद्धा फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी  महाराष्ट्रात जातीयवादाच्या विषाणूने अक्षरशः हैदोस घातला आहे.तोंडाला रक्त लागल्यासारखे इथले जातीयवादी किडे दलितांच्या रक्ताने तहान भागवत आहेत की काय अशी रास्त शंका निर्माण झाली आहे.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रोज कुठेनाकुठेतरी जातीयतेची कीड वळवळ करते आणि ह्या वळवळीत दलित समाज नाहक भरडल्या जातो.एक प्रकरण संपलं की दुसरं समोर येतं ,ते संपायच्या आधीच तिसरं येतं.हे सत्र थांबणार आहे की नाही ? ऐतिहासिक मराठवाड्यातील

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असणाऱ्या नेवपूर ह्या गावातील रस्त्याच्या चौकात त्याच गावातील बौद्ध बांधवांनी बहुजनांच्या अस्मितेचे आणि अस्तित्वाचे प्रतीक असणारा  निळा ध्वज लावला होता.नेमका हाच निळा ध्वज साक्षात कायद्याच्या रक्षकांनीच म्हणजे पोलिसांनी बौद्ध समाजबांधवांना विश्वासात न घेता काढला. ह्याचाच जाब विचारण्यासाठी सनदशीर मार्गाने गेलेल्या बौद्ध बांधवांना अक्षरशः जनावरासारखे अमानुषपणे लाठीकाठीने झोडपण्यात आले.ह्या लाठीहल्ल्यात दीपक कोतकर हा भीमसैनिक गंभीररीत्या जखमी झाला असून आणखी काही भीमसैनिक आणि  भिम आर्मीचे औरंगाबाद ग्रामीणचे जिल्हाप्रमुख मा.संजय वाहुल आणि गंगापूर तालुकाप्रमुख मा.भाऊसाहेब कुशेर हेही जखमी झाले. सदरहू घटनेची माहिती संजय वाहुल यांनी भिम आर्मीचे राज्य उपाध्यक्ष मा.बलराज दाभाडे यांना दिली असता ताबडतोब पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष गुणरत्नभाई सोनवणे ,  भिम आर्मीचे मराठवाडा प्रमुख बाळूभाऊ वाघमारे , युवा जिल्हाध्यक्ष भारतभाऊ गायकवाड ,कार्यकारिणी सदस्य नितीनभाऊ जाधव आणि संतोष भालेराव यांच्यासह इतर क्रांतियोद्धे नेवपूर गावात दाखल झाले असता समाजबांधवांना भेटण्यास पोलिसांनी त्यांस मज्जाव केला ,त्यावेळी बलराज दाभाडे ,गुणरत्नभाई सोनवणे ह्यांनी आंदोलनाचा इशारा देताच पोलिसांनी त्यांस भेटू दिले.त्यावेळी रात्रीचे १२ वाजून गेले होते.भिम आर्मीच्या टीमने समाजबांधवांची , जखमी भीमसैनिकांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला.ह्या सर्व घटनेची दखल घेऊन गुजरातच्या दौऱ्यावर असणारे भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते अशोकभाऊ कांबळे यांनी सकाळीच महाराष्ट्राचे गृहमंत्री मा.अनिलजी देशमुख यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली असून अन्यथा महाराष्ट्रभर भिम आर्मी उग्र आंदोलन छेडेल असा जाहीर इशारा अशोकभाऊ कांबळे यांनी दिला आहे. तसेच भिम आर्मी  महाराष्ट्र राज्याच्या राज्यप्रमुख मा.नेहाताई शिंदे यांनी सुद्धा सरकारला धारेवर धरताना पोलिसांच्या अमानुषतेवर जोरदार प्रहार केला. तर घटनास्थळी उपस्थित असणारे बलराज दाभाडे ह्यांनी तिथल्या पोलीस प्रशासनाला  इशारा दिला की आता एकाही भीमसैनिकाला कुठल्याही प्रकाराचा त्रास दिला तर संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक होईल. तुमचे हे पशुतुल्य कृत्य संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. या प्रकरणातील कन्नड डी वाय एस पी आणि पीशोर पोलीस स्टेशनचे  पी आय यांना निलंबीत करा ,अन्यथा भीम आर्मी सह  सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटनांतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र असे आंदोलन करण्यात येईल.

संबंधित पोस्ट