शाहू-आंबेडकर नात्यातील दुवा निखळला...

मुंबई (जीवन तांबे) : शाहू महाराजांच्या 'सत्यशोधक हॉटेल'च्या वारसाचा मृत्यू!सामाजिक समतेसाठी आग्रही असणाऱ्या राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजातील गंगाराम कांबळे यांना 'सत्यशोधक हॉटेल' सुरू करून दिले होते. हे हॉटेल मध्ये राजश्री शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या विचारांचं प्रतीक बनलं होतं. शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा हा वारसा ते हॉटेल चालवणाऱ्या गंगाराम कांबळे यांच्या नात सुवर्णा कांबळे यांचं नुकतच दुर्दैवी निधन झालं. त्याच्या निधनाने शाहू-आंबेडकर नात्यातील दुवा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

गंगाराम कांबळे यांच्या सुवर्णा कांबळे या नात होत्या. त्या विक्रोळीत रहाण्यास आल्यापासून त्यांनी स्वतःला आंबेडकरी चळवळीत झोकून दिले होते. गेल्या चौदा वर्षापासून त्यांनी छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून हा उत्सव सुवर्णा कांबळे ह्यांच्या नेतृत्वाखाली आज ही सुरू होता. सुवर्णाचे कांबळे ह्या राजर्षी शाहू महाराजांचा विचारांचा वारसा पुढे नेत होत्या.

कोल्हापूर संस्थानचे प्रमुख राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी अस्पृश्य समाजातील गंगाराम कांबळे यांना नोकरीतून मुक्त करून स्वतःचा धंदा सुरू करण्यास प्रवृत्त केले होते. सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी शाहू महाराजांनी टाऊन हॉल परिसरात गंगाराम कांबळे यांना १९२६ साली ‘सत्यशोधक हॉटेल’ काढून दिले. कांबळे अस्पृश्य असल्याने उचवर्णीय कोणी ही चहा पित नसत. त्यामुळे शाहू महाराज आपल्या सहकाऱ्यांसमवेत कोल्हापूरात फेरफटका मारताना स्वत: चहापान दुकानासमोर येऊन गंगाराम कांबळे यांच्या हातून चहा पीत असत.  

शाहू महाराजांच्या त्या ऐतिहासिक निर्णयाचा सुवर्णाचे कांबळे ह्यांना सार्थ अभिमान होता.

कोल्हापुरात घडलेली ती घटना महाराजांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात मैलाचा दगड ठरली होती. गंगाराम कांबळे यांना चहाचे दुकान सुरू करून देण्याचं शाहू महाराजांचं हे क्रांतिकारक पाऊल ठरलं. अस्पृश्य समाजाला मुख्य धारेत आणून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे सह सामाजिक समतेचा संदेश यातुन दिला गेला असल्याचे सुवर्णाचे यांचे मत होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९१९ रोजी बावडा बंगल्याच्या आवारात असलेल्या मराठ्यांच्या हौदाला एका अस्पृश्य व्यक्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला असता एकच खळबळ माजली होती. त्या स्पर्श करणाऱ्या व्यक्ती म्हणजे घोड्याच्या पागेत काम करणारा अस्पृश्य व्यक्ती गंगाराम कांबळे होय. अस्पृश्य व्यक्तीने स्पर्श केल्याने सवर्णांनी त्यांना रक्तबंबाळ केले होते.  

ही घटना घडली तेव्हा शाहू महाराज कामा निमित्त दिल्लीला गेले होते. शाहू महाराज आले तेव्हा ही घडलेली घटना त्याच्या कानावर टाकण्यात आली. शाहू महाराज यांना खूपच वाईट वाटले. त्यांनी गंगाराम यांना मिठी मारली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. ज्यांनी गंगाराम यांना मारहाण केली होती त्यांना सर्वाना बोलावून सर्व समक्ष चाबकाने मारले होते.

शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना नोकरीतून मुक्त केले आणि स्वतःचा धंदा सुरू करण्यास प्रवृत्त केले. सामाजिक समतेच्या हेतूने राजर्षी याच गंगाराम कांबळे यांच्या चळवळीचा वारसा पुढे त्यांची नात सुवर्णा कांबळे यांनी चालवला. त्या विक्रोळी परिसरातील इमारत क्रमांक १९५ मध्ये गेली कित्येक वर्षे रहात आहेत. त्यांनी आजोबांचा वारसा पुढे चालवीत असताना त्यांच्या पतीचे निधन झाले असता त्यांनी परिसरात घरगुती वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करीत मुलांना मोठे केले.

त्यातच काही दिवसात मोठ्या मुलाचे अकाली निधन नंतर अचानक अपंग नातूचा ही मृत्यू झाला हे दुःख पचवत त्या आपल्या आजोबांची चळवळ गेली ७१ वर्ष सुरू ठेवली होती. वृद्ध झाल्यातरी खचून न जाता ते आपला घरगुती वस्तू विकण्याचा धंदा सुरुच ठेवला होता.

कोरोनाने देशभर थैमान घातल्याने मुंबईभर लॉकडॉउन सुरू झाले तरी या माता आपल्या  पोटाची खळगी भरण्याकरिता अहोरात्र कष्ट करत होत्या. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी. त्याचा त्यांना त्रास जाणवू लागल्यावर विक्रोळी परिसरातील सुश्रुत रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता या चळवळीतील सक्रिय रणरागिनींचा काल मृत्यू झाला.

विक्रोळी परिसर हा आंबेडकरी परिवर्तनवादी चळवळीचा गड मनाला जातो. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या निधनाने या गडाचे बुरुज ढासळले आहेत. त्यातच आता गंगाराम कांबळे यांची नात सुवर्णा कांबळे यांचा ही मृत्यू झाल्याने विक्रोळी परिसरातील आंबेडकरी व परिवर्तनवादी चळवळीत मोठी दरी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे.

संबंधित पोस्ट