राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा सक्षम पिढी घडविणाऱ्या सर्व शिक्षकांचा महाराष्ट्राला अभिमान उपमुख्यमंत्री अजित पवार
- by Reporter
- Sep 05, 2020
- 418 views
मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीत गुरु शिष्याची समृद्ध परंपरा आहे. विद्यार्थ्यांना गुणवंत, ज्ञानवंत, चारित्र्यसंपन्न बनवून देशासाठी सक्षम पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतात त्या सर्व गुरुजनांचा महाराष्ट्राला अभिमान आहे, असे गौरवोद्गार काढत राज्यभरातील सर्व शिक्षक बंधु-भगिनींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षक दिनानिमित्त माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीला वंदन केले.
माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करतो. आपल्या राज्याला गौरवशाली शैक्षणिक वारसा आहे. महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या असंख्य ध्येयनिष्ठ गुरुजनांनी राज्यात शिक्षणाची बीजे रोवली. शिक्षणाची गंगा सामान्यांच्या दारापर्यंत नेली. राज्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणली. विद्यार्थ्यांच्या कित्येक पिढ्या घडवल्या. याच पायावर आजचा संपन्न, समृद्ध आणि सुसंस्कृत महाराष्ट्र उभा आहे. आजही महाराष्ट्रात अनेक ध्येयवादी शिक्षक कार्यरत आहेत. या सर्व गुरुजनांचा महाराष्ट्राला अभिमान आहे. राज्यात सक्षम शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी राज्य शासन नेहमीच तत्पर असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.
रिपोर्टर