कंगना राणावतच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुलुंडमध्ये शिवसैनिकांचे निषेध आंदोलन

मुलुंड (शेखर भोसले) : मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय, असे ट्विट करत मुंबई पोलीस व राज्य सरकारवर सिने अभिनेत्री कंगना रानावत हिने टीका केली. तिच्या या वक्तव्याने राजकीय धुळवड उडाली असून शिवसेनेने तिच्या या ट्विटचा कडक शब्दात समाचार घेतला आहे.

ईशान्य मुंबई शिवसेनेच्या वतीने विभागप्रमुख, आमदार रमेश कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली आज मुलुंडमध्ये कंगना राणावत विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सातत्यानं वक्तव्य करणाऱ्या कंगना राणावत हिनं सुरुवातीला बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका केली होती. त्यानंतर थेट राजकीय भूमिका घेत मुंबई पोलीस व राज्य सरकारवर टीका केली. 'मला मूव्ही माफिया आणि गुंडांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे. मुंबई पोलिसांची नको, प्लीज,' असं ट्विट करत तिनं मला पाकव्याप्त काश्मीर मध्ये असल्यासारखे वाटत आहे, असे म्हटले होते. तिच्या या वक्तव्याने तिने मुंबई पोलिसांचा व मुंबईकरांचा अपमान केला असून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही आहे. तिला जर मुबंई पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तिने मुंबई सोडून निघून जावे अश्या कडक शब्दात समाचार घेत विभागप्रमुख, आमदार रमेश कोरगावकर यांनी कंगना राणावतच्या वक्तव्याचा निषेध केला असून तिला शिवसेना स्टाईलने समज दिली आहे.

यावेळी आमदार सुनिल राऊत, महिला विभाग संघटिका संध्या वढावकर व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाषण करून कंगना राणावतचा तिखट शब्दात निषेध केला. या निषेध आंदोलनाच्या वेळी मोठया संख्येने महिला व पुरुष शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते होतं. भडकलेल्या शिवसैनिक महिलांनी कंगनाच्या पोस्टरवर शाई फासून तिच्या पोस्टरला चप्पलेने मारत निषेध केला व तिचा धिक्काराच्या घोषणा दिल्या. तर काही शिवसैनिकांनी तिचे पोस्टर जाळत निषेध नोंदवला.

सुरुवातीला मुलुंड पश्चिमेकडील स्टेशनच्या शाखेजवळ जमलेल्या शिवसैनिकांनी आमदार रमेश कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने मुलुंड स्टेशनला जात तेथे निषेध आंदोलन केले. मोठया प्रमाणात मुलुंड पोलिसांचा बंदोबस्त यावेळी उपस्थित होता.

संबंधित पोस्ट