मुलुंडमध्ये पुन्हा वाढत आहेत कोरोना रुग्ण

मुलुंड (शेखर भोसले) : कोरोनाचा संसर्ग पसरून साडे पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी अद्याप कोरोना आटोक्यात येताना दिसत नाही आहे.  काल दिवसभरात मुलुंडच्या टी वार्डात एकूण ९५ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने मुलुंडकरांच्या मनात पुन्हा एकदा भीतीची छाया उमटली आहे. शासनाने कोरोनापासून बचावासाठी सांगितलेल्या नियमांचे पालन करून व योग्य ते सोशल डिस्टन्स राखूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने कोविड १९ वर लस कधी येणार याची आतुरतेने मुलुंडकर वाट पाहत आहेत.  

गेले काही दिवस कोविड १९ रुग्णांची संख्या मुलुंडमध्ये कमी आढळत होती परंतु कालच्या दिवसांत टी वार्डात ९५ रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२८ वर पोहचली असून त्यात सध्या उपचार घेणाऱयांची संख्या ८७९ असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५२२६ आहे तर मृतांची एकूण संख्या ३२३ झाली आहे.  

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेच्या टी वॉर्डने मुलुंड पूर्व आणि पश्चिम येथे मोफत कोरोना चाचणी केंद्रे सुरु केली आहेत. मुलुंडकर या केंद्राचा लाभ घेताना दिसत असल्याने कोरोना रुग्ण वाढत असून लवकरच हे प्रमाण कमी होवू शकते असे टी वॉर्ड पालिका अधिकाऱयांनी सांगितले.

संबंधित पोस्ट