
पालिकेच्या निर्णयाने मुलुंडमधील अतिदक्षता विभागात बेड्सची कमतरता
- by Reporter
- Sep 03, 2020
- 478 views
मुलुंड (शेखर भोसले) : पालिकेच्या नवीन निर्णयानुसार ज्या रुग्णालयाची बेड्सची क्षमता ५० पेक्षा कमी आहे, अश्या खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्यास मनाई करून एकूण ७२ लहान रुग्णालयांना कोविड १९ च्या रुग्णांवर उपचार करण्यास मनाई केली. या निर्णयाचा फटका खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील बेड्सला बसणार आहे. या निर्णयाचा परिणाम
मुलुंडमधील चार लहान खाजगी रुग्णालयांना बसला असून या रुग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्ण दाखल करून घेण्यास बंद केले असल्याचे समजले आहे.
मुलुंडमधील मनीषा, प्लॅटिनम, ऍपेक्क्स आणि आशीर्वाद या खाजगी रुग्णालयांवर पालिकेच्या या नियमाचा परिणाम होणार असून फक्त फोर्टिस रुग्णालय हे एकमात्र खाजगी रुग्णालय कोरोनाबाधितांसाठी उपलब्ध राहणार आहे तसेच पालिकेचे रिचर्ड्सन अँड क्रुडास जम्बो कोविड उपचार केंद्रात अद्याप अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला नसल्यामुळे बेड्सची कमतरता निर्माण होऊन मुलुंडकर रुग्णांना याचा फटका बसू शकतो.
रिचर्ड्सन अँड क्रुडास जम्बो कोविड उपचार केंद्राचे प्रदीप आंग्रे यांनी यासंदर्भात सांगितले की, अतिदक्षता विभागातील बेड्स आले आहेत परंतु या विभागाचे काम अद्याप बाकी असल्याने पूर्ण विभाग चालू व्हायला अजून १५ ते २० दिवस लागणार आहे. त्यामुळे मुलुंडमधील रुग्णांना मुलुंडबाहेर उपचारासाठी जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रिपोर्टर