
कलाक्षेत्रातील संघटित आणि असंघटित कलावंताना एकत्रित आणणार
कलावंत आणि लोककलावंताच्या न्याय्य-हक्कासाठी लढणार महा कला मंडल
- by Reporter
- Sep 03, 2020
- 365 views
मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या कलेच्या माध्यमातून मनोरंजन आणि मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्या कलाकार आणि लोककलावंतांवर करोनाच्या संकटामुळे उपासमारीची वेळ आली आहे. या कलावंतांना एकत्रितपणे संघटित करून त्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचविण्यासाठी महा कला मंडल या शिखर संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. ही केवळ एक संस्था वा संघटना नसून राज्यातील सर्व लोककलावंत, वाद्यवृंद कलाकार, नाट्यकलावंत, पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञ मंडळींना एका छताखाली आणून त्यांच्या न्याय-हक्कासाठी लढणारी संघटना असेल, असा निर्धार या शिखर संघटनेचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
आपल्या महाराष्ट्रात २०-२० किमी अंतरावर बोलीभाषा आणि अन्न संस्कृती बदलते. तशीच लोककलेची संस्कृतीसुद्धा बदलते. कोकणातील दशावतरापासून तमाशाच्या कणादिसह विदर्भातील
झाडेपट्टी, खेळेमेळे सादर करणारे लोककलाकार व तंत्रज्ञ यांची संख्या लाखाच्या घरात आहे. पण हे सारे असंघटित असल्यामुळे शासन दरबारी असलेल्या सोयी सुविधांपासून नेहमीच वंचित राहिले आहेत. त्यातच पाच महिन्यापासून करोनामुळे कलेच्या माध्यमातून मिळणारा आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोतच बंद झाल्यामुळे त्याच्यावरच अवलंबून असलेल्या कलाकारांची-तंत्रज्ञांची अवस्था फार बिकट झाली आहे. या सर्व मंडळींना एकत्रित करण्याचे शिवधनुष्य महा कला मंडलच्या माध्यमातून आम्ही केले आहे. आतापर्यंत ११५ हून अधिक संघटना आणि त्यांच्या अंतर्गत तीन लाखांपेक्षा अधिक असलेल्या कलाकारांची माहिती गोळा करण्याचे महत्त्वपूर्ण काम मंडलाने केले असल्याचेही भोसले यांनी माहिती दिली. गेल्याच महिन्यात पुण्यात मेघराज भोसले यांच्या अध्यक्षतेखाली महा कला मंडल या शिखर संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
संघटित आणि असंघटित अशा सर्वच कलाकारांची शासन दरबारी नोंद करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठीच आम्ही आग्रही राहणार आहोत. तसेच प्रत्येक कलाकाराचा शासनाच्या वतीने विमा काढला जावा. या राज्यभर पसरलेल्या कलाक्षेत्राला इंडस्ट्रीचा दर्जा प्राप्त करून द्यावा. शासकीय सवलतीने हक्काचे घर व एकत्रित विकासासाठी भूखंड मिळावा. त्याचबरोबर रेल्वे-बस प्रवासाच्या शुल्कात सवलत मिळावी व इतर मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्dयाचे महा कला मंडलचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले. मुंबईत झालेल्या परिषदेत सिने कलाकार सुशांत शेलार, संस्थेचे निमंत्रक उदय साटम, मुकेश उपाध्ये, संतोष लिंबोरे, मराठी व्यावसाकि वाद्यवृंद निर्माता संघ, लावणी महासंघ, रजनी कलावंत सामाजिक सांस्कृतिक संस्था या विविध कला संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी शंकर पिसाळ : ८३६९०४८०१८
रिपोर्टर