
पालिकेच्या उदासीनतेमुळे गणेश मूर्ती संकलन केंद्राकडे भाविकांनी फिरवली पाठ
- by Reporter
- Sep 03, 2020
- 1095 views
मुलुंड (शेखर भोसले) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन घाटावर गणेश मूर्त्यांचे विसर्जन करताना गर्दी होवू नये यासाठी पालिकेच्या टी वॉर्डने उभारलेल्या गणेश मूर्ती संकलन केंद्राकडे भाविकांनी पाठ फिरवल्याचे उघड झाले असून लोकांमध्ये व्यवस्थितपणे जागृती न केल्याने मुलुंड पूर्व आणि पश्चिम मिळून ११ ठिकाणच्या गणेश मूर्ती संकलन केंद्रावर १०० पेक्षाही कमी गणेश मूर्त्यांचे संकलन झाले असल्याचे समजले असून या संकलन केंद्रांना चांगला प्रतिसाद न मिळाल्याचे समोर आले आहे.
पालिका प्रशासनाकडून फारशी जनजागृती न करण्यात आल्यामुळे नागरिक या गणेश मूर्ती संकलन केंद्राबद्दल अनभिज्ञ राहिले. ही केंद्रे रात्री ८ वाजेपर्यंत खुली होती परंतु लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱयांनी ही माहिती लोकांपर्यंत पोहचवणे आवश्यक होते परंतु तसे झाले नाही. तसेच अनेक भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन पाहण्याची उत्सुकता असते मात्र संकलन केंद्रावर हे विसर्जन पाहू शकत नसल्यामुळे अनेक भाविकांनी संकलन केंद्राकडे न जाता विसर्जन तलावात गणेश मूर्ती विसर्जन करण्याला प्राधान्य दिल्याने भाविकांनी या गणेश मूर्ती संकलन केंद्राकडे पाठ फिरवल्याचे अनेक भाविकांनी सांगितले.
अनंत चतुर्दशी आटोपून दोन दिवस उलटले तरी मुलुंडमधील एकूण ११ संकलन केंद्रात किती गणेश मूर्त्या जमा करण्यात आला याची तपशीलवार माहिती अद्याप पालिकेच्या टी वॉर्डकडे उपलब्ध झाली नव्हती त्यामुळे प्रशासन देखील या गणेश मूर्ती संकलन केंद्राच्या बाबतीत किती उदासीन आहे, हे स्पष्ट होत आहे.
रिपोर्टर