
६ महिन्यांपूर्वी केबल दुरुस्तीच्या कामासाठी खोदण्यात आलेला रस्ता अद्याप दुरवस्थेत
- by Reporter
- Sep 02, 2020
- 958 views
मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनीतील स्वप्नीलच्या गल्लीतील रस्ता केबल कामासाठी ६ महिन्यांपूर्वी महावितरणच्या कर्मचाऱयांकडून खोदण्यात आला होता. अद्याप हा रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नसल्याने दुचाकी व रिक्षा तेथून जाताना उडत आहेत परिणामी दुचाकी स्वारांना व रिक्षातील प्रवाशांना शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तसेच खोदलेल्या रस्त्याचे डांबरी डेब्रिज देखील बाजूच्याच पदपथावर टाकण्यात आले असल्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालताना त्रास होत आहेच शिवाय त्या डेब्रिजमुळे परिसरात अस्वछता निर्माण झाली आहे.
महावितरणने केबल टाकण्यासाठी खोदलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता घाटोळ यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, रस्ता दुरुस्तीचे काम पालिकेचे असून महावितरणने या रस्त्याच्या दुरुस्तीचे पैसे पालिकेकडे भरले आहेत. पालिका अधिकाऱयांशी पाठपुरावा करून रस्ता दुरुस्त करून घेतो व डेब्रिज ताबडतोब उचलायला सांगतो, असेही घाटोळ यांनी पुढे सांगितले.
पालिकेच्या रस्ता दुरुस्ती खात्याकडे विचारणा केली असता करतो, बघतो यापलीकडे उत्तर देण्याचे टाळले जात आहे. परंतु महावितरण आणि पालिकेच्या रस्ता दुरुस्ती खात्यामध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे टाटा कॉलनीतील नागरिकांना मात्र नाहक शारिरिक त्रास सहन करावा लागत आहे तसेच तेथे पडलेल्या डेब्रिजच्या ढिगाऱयांमुळे परिसर देखील अस्वच्छ झाला आहे परंतु ढिम्म पालिका प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे. जबाबदारीची टोलवाटोलवी सोडून लवकरात लवकर येथील डेब्रिज उचलून पदपथ स्वच्छ करावा तसेच रस्ता दुरुस्त करून घ्यावा, अशी मागणी येथील रहिवाशी करत आहेत.
रिपोर्टर