कोणतेही गालबोट न लागता शांततेत मुलुंडमध्ये श्री गणेशाचे विसर्जन
- by Reporter
- Sep 02, 2020
- 719 views
मुलुंड (शेखर भोसले) : १ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुलुंड पूर्व व पश्चिम येथे अत्यंत शांततेत व उत्साहात, कोणतीही अनुचित घटना न घडता लाडक्या बापाचे विसर्जन करण्यात आले. एकूण ६ तलावात मिळून ८५० घरगुती गणपतींचे विसर्जन झाले तर ११२ सार्वजनिक गणरायांचे विसर्जन झाले. प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्स राखत तोंडाला मास्क लावून भाविकांनी अत्यंत शिस्तीत श्री गणरायांचे विसर्जन केले.
मुंबई महानगर पालिका व मुलुंड पोलिस आणि नवघर पोलिसांनी केलेल्या चोख व्यवस्थेमुळे विसर्जनासाठी येणार्या लाडक्या बाप्पाचे कोणत्याही अडथळ्याशिवाय तसेच गर्दीचा सामना न करता कमी वेळात विसर्जनाचे सोपस्कार पार होत होते. घरातूनच श्री गणेशाची शेवटची आरती करून आल्यामुळे विसर्जन स्थळी गर्दी होत नव्हती. पोलिसांच्या उत्तम बदोबस्तामुळे परिस्थिती सर्वत्र नियंत्रणात होती.
मुलुंड पश्चिम येथील कालिदास नाट्यगृहाजवळील कृत्रिम तलावात ६६ घरगुती, २४ सार्वजनिक; जकात नाक्याजवळील कृत्रिम तलावात ६१ घरगुती, १९ सार्वजनिक; स्वप्ननगरीतील कृत्रिम तलावात २९५ घरगुती, २८ सार्वजनिक; मुलुंड पूर्व येथील वामनराव शाळेच्या बाजूला बनविण्यात आलेल्या कृत्रिम तलावात ३१ घरगुती, १ सार्वजनिक; पूर्व द्रुतगती महामार्गावरील मोरया तलावात ३२२ घरगुती, ३५ सार्वजनिक तर मिठागर रोड येथील गणेश घाटावरील तलावात ७५ घरगुती आणि ५ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाले. गेल्या १० दिवसांत मुलुंडमध्ये एकूण ५३८४ घरगुती गणपतींचे तर २२२ सार्वजनिक गणरायांचे विसर्जन झाले.
गेल्या वर्षी २०१९ साली ८१९६ घरगुती गणपतींचे विसर्जन झाले होते तर २७१ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाले होते. त्यामुळे यंदा कोरोनामुळे २८१२ घरगुती आणि ४९ सार्वजनिक श्री गणेशाच्या मूर्तींचे सोसायटीत बनविण्यात आलेल्या पॉंड्स मध्ये किंवा घरातच विसर्जन झाले असावे असा अंदाज पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

रिपोर्टर