पालिका खात्याअंतर्गत असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे ड्रेनेज लाईनचे काम दोन महिन्यांपासून प्रलंबित

मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पश्चिमेला स्टेशनसमोरील सरदार वल्लभभाई पटेल रोड आणि एमजी रोडच्या जंक्शनला गेल्या दोन महिन्यांपासून ड्रेनेज लाईनच्या दुरुस्तीचे काम चालू असून, या ड्रेनेजच्या कामासाठी तेथील रस्ता आडव्या पद्धतीने खोल खोदून ठेवण्यात आला आहे. हा रस्ता बंद करण्यात आला असल्यामुळे वाहनचालकांना याचा फटका बसत आहेच परंतु त्याचबरोबर प्रवाशांना व पादचाऱयांना देखील अनेक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने वाहनचालक व नागरिक हैराण झाले आहेत.

दोन महिन्यांपासून ड्रेनेजच्या कामासाठी मंदिरासमोरील रस्ता खोल खोदून ठेवला असून पादचाऱयांना ये-जा करण्यासाठी एक चिंचोली वाट मंदिराच्या बाजूने ठेवण्यात आली आहेत. ही चिंचोली वाट देखील मोकळी सोडण्यात आली नसून या वाटेवर देखील डेब्रिज, लाकडी फळ्या व इतर दुरुस्तीचे सामान ठेवण्यात आले असल्यामुळे पादचाऱयांना कसरत करत जीव मुठीत घेवून तेथून वाट काढावी लागत आहे. थोडा जरी तोल गेला तर पडून अपघात होण्याची व मार लागण्याची भीती येथून ये जा करणाऱ्या पादचाऱयांच्या मनात सतत येत असते त्यामुळे पालिकेच्या या विकास कामाचा नागरिकांनी धसका घेतला असून कधी एकदा हे काम संपते याकडे नागरिक डोळे लावून बसले असून
पालिका अधिकाऱयांच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहत कूर्मगतीने चाललेले हे काम लवकर संपू दे म्हणून

बाजूच्या मंदिरातील देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहेत.

पालिकेच्या टी वॉर्ड दुरुस्ती खात्याचे अधिकारी सचिन नेहरे यांच्याकडे काम कधीपर्यंत पूर्ण होईल याबाबत विचारणा केली असता, पाण्याच्या लाईन्स जमिनी खालून जात असल्यामुळे पालिकेच्या पाणी खात्याने या लाईन्स वळवून देणे जरुरीचे आहे. पाण्याच्या लाईन्स वळवल्यानंतर ड्रेनेज लाईन्सचे काम चालू होवून पुढील १५ दिवसात पूर्ण होईल व त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी आणि पादचाऱयांसाठी मोकळा करून दिला जाईल, असे सांगितले.

घाटकोपर येथील पाणी खात्याचे सहाय्यक अभियंता डी.बी. जाधव यांच्याकडे विचारणा केली असता मागील १५ दिवस पाऊस मोठया प्रमाणात होता त्यामुळे काम होवू शकले नाही परंतु आता पाऊस उघडला असल्यामुळे कामाला सुरुवात करण्यात आली असून येत्या दोन दिवसांत पाण्याच्या लाईन्स वळवायचे काम पूर्ण होऊन जाईल.

दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लागलेल्या ड्रेनेज लाईनच्या या कामातून पालिकेच्या खात्याअंतर्गत असलेला समन्वयाचा व नियोजनाचा अभाव दिसून आला असून नागरिकांना मात्र त्यामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे मत नागरिकांनी यासंदर्भात व्यक्त केले आहे.

संबंधित पोस्ट