
महाराष्ट्र सरकारने हिरवा कंदिल दिल्यास मुंबईत लोकल रेल्वे सुरु करणार : मध्य रेल्वे
- by Reporter
- Aug 27, 2020
- 1664 views
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारने हिरवा कंदिल दिल्यास मुंबईत लोकल वाहतूक सुरु करण्यासाठी तयार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांनी दिलीय. मुंबईची लाईफलाईन म्हणजे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा. याच रेल्वेतून लाखो नागरिक प्रवास करत असायचे. मात्र, कोरोनामुळे मुंबईतील रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी सुरु आहे. अशात विविध संस्था आणि संघटनांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सुरु करावी अशी मागणी देखील होतेय. या पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वेने सेवा पुन्हा सुरु करण्यास सहमती दर्शवली आहे.
उपनगरील मध्य रेल्वे लोकल सेवा सुरु करण्याबाबत आम्ही राज्य सरकारवर अवलंबून आहोत. 'राज्य सरकारने मागणी केल्यास लोकल त्वरित सुरु करू', असं मध्य रेल्वेचे डीएमआर गोयल म्हणालेत. या सोबतच कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत रेल्वेवरील गर्दीचा भार कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळेत बदल करण्याची मागणीही मध्य रेल्वेकडून केली जात असल्याचं समजतंय. मुंबईतील मध्य रेल्वे लोकल सुरु करण्यास आम्ही कधीही तयार असल्याचंही गोयल म्हणालेत.
मुंबई लोकल आणि ई पास बाबत घाईगडबडीत निर्णय घेणार नाही : मुख्यमंत्री
जगभरात ज्या काही गोष्टी घाईगडबडीत केल्या असतील त्या गोष्टी महाराष्ट्र करणार नाही, आपण ज्या ज्या गोष्टी सुरु केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊन आपण या गोष्टी सुरु केल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत एखादी गोष्ट सुरू किंवा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र घेणार नाही, असे उध्दव ठाकरे म्हणाले आहेत. याचाच अर्थ मुंबई लोकल सुरू होण्यासाठी आणि ई पासची प्रक्रिया बंद होण्यासाठी आणखीन काही काळ वाट बघावी लागणार हे स्पष्ट झाले आहे.
रिपोर्टर