राज्य आणि देश सर्वोत्तम झाला पाहिजे हे स्वप्न कायम बाळगा,माती आणि मातेला विसरू नका: मुख्यमंत्र्यांनी दिला मोलाचा सल्ला
- by Adarsh Maharashtra
- Aug 25, 2020
- 1032 views
मुंबई, दि. २५: प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाराष्ट्राचे वैभव आणि उद्याचे भाग्यविधाते उमेदवार भविष्यातील जबाबदारीची परीक्षा देखील जिद्दीने पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना माती आणि मातेला मात्र विसरू नका, असा सल्लाही त्यांनी प्रशासकीय सेवेत रूजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत २०१९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील ७९ उमेदवारांचा गौरव समारंभ महाराष्ट्र विधानमंडळामार्फत विधानभवन येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री ॲड. अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी यावेळी उपस्थित होते.
प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, आता पंख फुटले आहेत, मोठी भरारी घ्यायची आहे. त्यामुळे कोणतीही जबाबदारी पार पाडताना सकारात्मक बदल घडून माझे राज्य, देश सर्वोत्तम झाले पाहिजे ही जिद्द बाळगा. शासन आणि प्रशासन ही दोन चाके असल्याने चुकीचे काम होऊ न देता चांगल्या कामावर ठाम राहून आपल्या हातून उत्तम कार्य घडो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. राज्यातील सध्याचे प्रशासकीय अधिकारी उत्तम काम करीत असून सर्वांच्या सहकार्याने शासन सकारात्मकतेने काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री.नाईक निंबाळकर यांनी, सरकार कुणाचेही असले तरीही प्रशासकीय अधिकारी हा महत्त्वाचा घटक असल्याने कायदा योग्य रितीने वापरून सर्वसामान्यांची कामे सकारात्मकतेने करा, असे सांगितले. विधिमंडळाद्वारे प्रशासकीय सेवेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या सत्काराचा पायंडा यापुढेही कायम राहील असेही ते म्हणाले.
श्री.पटोले यांनी विधीमंडळामार्फत सत्काराचा हा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असल्याची माहिती देऊन हा सत्कार राज्याच्या वतीने असल्याने पुढील पिढीसाठीही मार्गदर्शक ठरेल, असे सांगितले. शासनाने राज्यातील प्रशासकीय सेवा परीक्षेसाठी प्रशिक्षण केंद्र सर्व विभागीय पातळीवर सुरू करून त्यांचे सशक्तीकरण करावे, अशी सूचनाही केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या इमारतीत हा सत्कार होत असल्याने याला विशेष महत्त्व असल्याचे सांगून आपण कोणतीही जबाबदारी पार पाडताना सर्वसामान्यांना न्याय देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण कराल, असा विश्वास व्यक्त केला. आपण मिळविलेले यश हे मोठे आहे. अनेक उमेदवार हे सर्वसामान्य घरातून आलेले आहेत, सर्व यशस्वी उमेदवारांचे कौतुक करून कोणताही प्रश्न टाळण्यापेक्षा संवेदनशील बनून तो सोडवण्यावर भर द्यावा. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन आपल्या हातून लोकाभिमुख काम व्हावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
महसूलमंत्री श्री.थोरात यांनी राज्य किंवा देश पुढे नेण्यात अधिकाऱ्यांची मोठी जबाबदारी असल्याचे सांगून राज्याचा नावलौकिक वाढवा, अशा शुभेच्छा दिल्या.
श्री.फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकारी हा लोकाभिमुख काम करण्यासाठी आणि सरकारची प्रतिमा ठरवणारा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. आपल्या अधिकारांचा सकारात्मक उपयोग करून समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करायची आहे, हे विसरू नका. विनयशीलता बाळगून सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवता आले तर ती सर्वात मोठी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समाधान मिळेल असे सांगून त्यांनी भावी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यशस्वी उमेदवारांच्या वतीने नेहा भोसले आणि मंदार पत्की यांनी मनोगत व्यक्त करताना या सत्कारातून प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव असून ती निश्चित पार पाडू, असा विश्वासही व्यक्त केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नेहा भोसले, मंदार पत्की, आशुतोष कुलकर्णी, दीपक करवा, विशाल नरवाडे, राहूल लक्ष्मण चव्हाण, नेहा दिवाकर देसाई, अभयसिंह देशमुख, यशप्रताप श्रीमल, अश्विनी वाकडे, सुमित महाजन, योगेश कापसे, गौरी नितीन पुजारी, शंतनू अत्रे, अनिकेत सचान, अजहरोद्दीन काजी जहिरोद्दीन काजी, निमिश पाटील, महेश गीते, अमितकुमार महातो, प्रणोती संकपाळ, सुमित जगताप, प्रसन्ना लोध, अंकिता वाकेकर, स्वप्निल जगन्नाथ पवार, अभिषेक दुधाळ, डॉ.प्रदीप डुबल, करूण गरड, हृषीकेश देशमुख, निखिल कांबळे, संग्राम शिंदे, सत्यजित यादव, सुनील शिंदे या उपस्थित यशस्वी उमेदवारांचा गौरव चिन्ह आणि गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
ध्येय निश्चित असेल तर यश निश्चित मिळते हे या यशस्वी उमेदवारांनी दाखवून दिल्याचे सांगून विधानसभा उपाध्यक्ष श्री.झिरवाळ यांनी सर्वांचे आभार मानले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम