मुख्यमंत्र्यांनी एकदा डोंबिवलीत सहज फेरफटका मारावा, किमान खड्डे भरले जातीलः मनसे आमदाराचे आवाहन
- by Reporter
- Aug 25, 2020
- 718 views
कल्याण (प्रतिनिधी) : ठाणे परिसरात खड्ड्यांमुळं नागरिकांना होणारा मनस्ताप वाढत आहे. खड्ड्यांचा आकार वाढला असल्यानं अपघाताच्या घटनाही घडू लागल्या आहेत. याप्रकरणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारवर सूचक ट्विट करत निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीत सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण- शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण - शिळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील. पाहिजे तर मी स्वतः शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो,' असं ट्विट राजू पाटील यांनी केलं आहे.
ठाणे शहरातील वाढत्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टीकेनंतर ठाणे महापालिकेकडून खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या अचानक ठरलेल्या दौऱ्यानंतर ठाण्यातील महत्त्वांच्या महामार्गांवर रविवारी दिवसभर वेगाने काम सुरू झाले होते. मध्यरात्रीनंतरही अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांचा मार्ग बऱ्यापैकी खड्डेमुक्त करण्यात आला. त्यामुळे विरोधकांनी यावरून टीका केली.
दरम्यान, पावसाळ्यात खड्डे पडणे नित्याचे झाले असले तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील खड्ड्यांबाबत योग्य नियोजन करून कारवाई करण्याचे निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले होते. तसेच अधिकाऱ्यांना फोनवरून सूचना दिल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने खड्ड्यांच्या तक्रारी वाढल्या. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्याच्या कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून महापालिकेची बदनामी झाल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे कळवले होते. खड्डे भरण्याचे काम वेळेत सुरू झाले नाही तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवरही कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला.
रिपोर्टर