
काँग्रेसचे चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळेत नेते, प्रवक्ते खोटारडे भाजपा मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये
- by Reporter
- Aug 25, 2020
- 1978 views
मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाने चीन सोबत कोणता करार केलेला आहे याची माहिती देण्याऐवजी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पार्टीवर तद्दन खोटे, फुटकळ आरोप केले आहेत. प्रदेश भाजपकडून बंदी घातलेल्या कोणत्याही अप चा वापर केलेला नाही. प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे स्टंट करण्यापूर्वी आपल्याकडील माहितीचा शहानिशा तरी करा, असा सल्ला भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिला आहे.
श्री. उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश तर्फे २४ ऑगस्ट २०२० रोजी राज्यातल्या सर्व पत्रकारांना ओबीसी मोर्चा कार्यकारिणी यादीची पीडीएफ प्रत ई मेलवरून पाठवण्यात आलेली आहे. ही प्रत तपासण्याची तसदीही न घेता अर्धवट माहितीच्या आधारावर सचिन सावंत यांनी भाजपवर आरोप केले आहेत. पत्रकार मंडळीही त्यांना मिळालेल्या प्रसिद्धी पत्रकाची प्रत तपासू शकतात.
ज्या पक्षाच्या माजी अध्यक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल प्रकरणी खोटे आरोप केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयापुढे माफी मागावी लागली होती, त्या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्याने प्रसिद्धीसाठी असे खोटे बोलावे याचे नवल वाटत नाही.
काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून सध्या जो तमाशा चालू आहे, त्यामुळे या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचे देशभर हसे होत आहे. त्यावरून लक्ष वळविण्यासाठी सावंत यांनी हा उद्योग केला असावा, असेही श्री. उपाध्ये यांनी म्हटले आहे.
रिपोर्टर