
बाप्पासाठी चिमुकल्याचा आई-बापाकडे हट्ट, जातीभेदाच्या भिंती मोडत मुस्लीम कुटुंबात गणपती विराजमान
- by Reporter
- Aug 24, 2020
- 779 views
उस्मानाबाद (प्रतिनिधी) : भारतात हिंदू मुस्लीम ऐक्याच्या अनेक घटना आणि अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला घडताना आपण पाहतो. मग एखादं संकट असो किंवा सणवार, विविधतेने नटलेल्या परंपरेचं दर्शन आपल्याला घडतच असतं. असाच एक प्रसंग गणेश चतुर्थीला उस्मानाबादमधील कळंब इथे घडला. एका चिमुकल्याच्या हट्टापायी एका मुस्लीमधर्मियांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले. अस्लम आणि अर्शिया जमादार या दाम्पत्याने आपल्या चिमुकल्याचा हट्ट पुरवला आणि घरात क्यूट बाप्पाची प्रतिष्ठापना आणि आरतीची झाली.
अस्लम शेख यांनी फेसबुक पोस्टद्वारे हा संपूर्ण प्रसंग कथन केला आहे. त्यांच्या तीन वर्षांच्या चिमुकल्याने अब्रारने अम्मीकडे गणपती आणायचा हट्ट धरला. अर्शिया यांनी ड्यूटीवर असलेल्या अस्लम जमादार यांना याबाबत सांगितलं. त्यानंतर काही वेळाने घरात बाप्पांचं आगमन झाल्याचा फोटोच अर्शिया यांनी अस्लम जमादार यांना पाठवला. घरात बाप्पा आल्याने अब्रार अतिशय खूश आहे.
मागच्या वर्षी अब्रार शेजाऱ्यांसोबत गणपती आणायला गेला होता. तेव्हापासूनच त्याला बाप्पाचा लळा लागला. परंतु शेजाऱ्यांची बदली झाल्याने यंदा अब्रारला गणपती आणायला जाता आलं आणि मग त्याने बाप्पाला घरीच आणण्याचा हट्ट धरला. विशेष म्हणजे जातीधर्माच्या भिंती मोडून अस्लम आणि अर्शिया जमादार या दाम्पत्याने लेकराचा हट्ट पुरवत गणपती घरी आणला विधीवत त्याची प्राणप्रतिष्ठा करुन आरतीही केली.
रिपोर्टर