आज गणेश चतुर्थी त्या निमित्ताने श्री गणरायाची माहिती पार्वतीच्या पुत्राचे गणेश नावाचे रहस्य

२०२० मध्ये गणेश चतुर्थी हा उत्सव आज शनिवार दि. २२ ऑगस्टला आहे. संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अगदी ११ दिवसापर्यंत गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते. तसंच हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते.कारण गणपती विघ्नहर्ता आहे.गणपतीची अनेक नावं आहेत त्यापैकीच हे एक नाव. विघ्नहर्ता अर्थात संकटाचं हरण करणारा असं आहे. म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते.तसंच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा. या दिवशीच प्रारंभ होतो गणेशोत्सवाला. गणेशाच्या आगमनाने सगळीकडेच भक्तीमय वातावरण दिसून येते.

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती म्हणजेच गण+पती = गणपती देवाचा जन्म झाला होता. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो. पार्वती देवीला स्नानासाठी जावयाचे होते. पण आसपास लक्ष ठेवण्याकरता कोणीच नव्हते. तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली. या मूर्तीला पहारेकरी नेमलं आणि सांगितलं की, कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस. असे सांगून पार्वतीमाता स्नानासाठी आत गेली.

भगवान शंकर काही वेळाने तिथे आले आणि ते आत जाऊ लागले. तोच त्या पहारेकऱ्याने त्यांना अडवले. त्यावर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्या पहारेकऱ्याचं शिर धडावेगळं केलं. पार्वतीदेवी जेव्हा स्नान करून बाहेर आली तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्या संतापल्या. ते धडावेगळं शिर पाहून तिने पूर्ण ब्रम्हांड हादरवून सोडलं. सर्व देव अगदी ब्रम्हदेवापासून सगळे देव पार्वतीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. पण पार्वती कोणाचं काहीही ऐकून घेत नाही. तेव्हा शंकर देव आपल्या गणाला आदेश देतात की, पृथ्वीतलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला. तो त्याचं शिर घेऊन आला. भगवान शंकरांनी ते शिर पुतळ्याला लावले आणि त्या मूर्तीला जिवंत केले. हा पार्वतीचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) म्हणजेच गजानन होय. शंकर देवाने त्याला गणाचा ईश म्हणेज देव म्हणून गणेश नाव ठेवलं. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे.

संबंधित पोस्ट