
सोगाव-कोचरे संपर्क तुटला , शाई नदीवरील नवीन पूल अजूनही अर्धवट
- by Reporter
- Aug 22, 2020
- 547 views
शहापुर (महेश धानके) : शहापूर तालुक्यात सतत १० दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरु आहे.अतिवृष्टीमुळे शहापूर व मुरबाडला जोडणारा शाई नदीवरील सोगाव-कोचरे दरम्यानचा जुना पूल पाण्याखाली गेल्याने तीन दिवसांपासून नागरिकांचा संपर्क तुटला आहे.दरम्यान नव्याने मंजूर झालेल्या पुलाचे काम गेली तीन वर्षे कासवगतीने सुरु असल्यानेच माळशेजकडे जाणारा हा जवळचा व महत्त्वाचा मार्ग वारंवार बंद होत असल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
शहापूर-किन्हवली-सोगाव-कोचरे-टोकावडे मार्गे नगर हा शहापूर ते नगरदरम्यानचा जवळचा मार्ग मानला जातो.त्यामुळे शहापूरहून नगरकडे जाणारे बहुतांंश वाहतूकदार सरळगाव ऐवजी सोगाव-कोचरेमार्गे माळशेजकडे जातात.मात्र या मार्गावरचा जुना पूल कमी उंचीचा व मोडकळीस आलेला असल्याने दर पावसाळ्यात वाहतूक बंद ठेवावी लागते.त्यामुळे सोगाव परिसर व कोचरे परिसरातील टोकावडे, शिरोशी, माळ ,खापरी, सोगाव, किन्हवली, टाकीपठार, खरांगण या गावांचा अनेक दिवस संपर्क तुटत असतो.सोगावमधील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीही नदीपलिकडे कोचरे भागात असल्याने रस्ता बंद होताच शेतीची कामेही ठप्प होत असतात.कोचरे ते किन्हवली अशी दुधाची वाहतूक करणारे ,किन्हवलीकडे नोकरी-व्यापार यानिमीत्त येणारे लोक ,विद्यार्थीही अडकून पडतात. वारंवार अर्ज-निवेदनांद्वारे मागणी केल्यानंतर शहापूरचे माजी आमदार पांडूरंग बरोरा व मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांतून नाबार्डमधून शाई नदीवर कोचरे येथे नवा पूल मंजूर करण्यात आला. मात्र सुमारे ४ कोटी २५ लाख इतका निधी मंजूर होवूनही या नव्या पुलाचे काम गेले तीन वर्षे रखडले आहे.२०१७ पासून सुरु झालेल्या कामाला गती मिळत नसल्याने तीन वर्षांत फक्त पायाचे पाच स्तंभ उभे राहिले आहेत. जुन्नर येथील डी.एस.शेवाळे हे ठेकेदार हे काम करत असून त्यांच्या या संथगतीने सुरु असलेल्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागही दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जुन्या पूलावरून जाताना यापूर्वी अनेकदा माणसे, वाहने वाहून जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत.त्या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर नवा पूल वाहतूकीसाठी खुला होणे गरजेचे असताना सदरचे काम ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे रखडले की सार्वजनिक बांधकामच्या दुर्लक्षामुळे ? असा सवाल सोगाव परिसरातील ग्रामस्थ विचारत आहेत.
रिपोर्टर