गणपतीला २१ दुर्वांची जुडी का वाहतात?... अंक'शास्त्रा'मागे आहे अनलासुराच्या वधाची अख्यायिका

घरोघरी गणरायाचं आगमन  होणार आहे. सर्वांचा लाडका बाप्पा २२ ऑगस्टला घराघरात विराजमान होणार आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करतात. गणपतीला दुर्वांची जुडी वाहतात. यामुळे गणपती प्रसन्न होतो. गणपतीला दुर्वा खूपच प्रिय आहेत, असं मानलं जातं. त्यामुळे एकवीस दुर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण केली जाते.

का वाहतात दुर्वा?

गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक आख्यायिका आहे. ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असूराला गिळून टाकले.यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ दुर्वा असलेली एक जुडी अशा हिरव्यागार दुर्वांच्या काही जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी २१ दुर्वांची जुडी गणेशाला खाण्यास दिली. अथक प्रयत्नानंतर गणेशाच्या पोटातील जळजळ कमी झाली. त्यावेळी, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल असं गणरायांनी म्हटलं होतं. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.

औषधी वनस्पती

*दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा गुणकारी आहे. मानसिकदृष्ट्या शांती मिळावी यासाठीही दुर्वा लाभकारक आहे. कर्करोगाच्या रुग्णांवरही दुर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

दुर्वा चढवताना या मंत्राचा करा जप

ॐ गणाधिपाय नमः,
ॐ उमापुत्राय नमः,
ॐविघ्ननाशनाय नमः,
ॐ विनायकाय नमः
ॐ ईशपुत्राय नमः, ॐ सर्वसिद्धिप्रदाय नमः,
ॐ एकदन्ताय नमः,
ॐ इभवक्त्राय नमः
ॐ मूषकवाहनाय नमः,
ॐ कुमारगुरवे नमः


भाद्रपद शुक्ल चतुर्थी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.५७ पर्यंत आहे. त्यामुळे याच दिवशी गणेश स्थापना करावयाची आहे. गणेश स्थापना मध्यान्हकाली करण्याची परंपरा आहे. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.२५ पासून दुपारी १.५६ पर्यंत मध्यान्हकाली श्रीगणेशमूर्तीची स्थापना करावी, असे पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी सांगितले. ज्यांना या वेळेत गणेश स्थापना करता येणार नाही त्यांनी त्या दिवशी पहाटे पाचपासून दुपारी तीन वाजेपर्यंत गणेश स्थापना केली तरी चालेल. गणेशपूजनासाठी जेवढे साहित्य उपलब्ध होईल तेवढे वापरावे. जे नसेल त्या जागी अक्षता अर्पण कराव्या. गणेशपूजेसाठी पुरोहित नसतील तर पुस्तकावरून किंवा ऑनलाइन अ‍ॅप वापरून पूजा करावी. २५ ऑगस्ट रोजी दुपारी १.५८ नंतर गौरी आणावयाच्या आहेत. २६ ऑगस्ट रोजी गौरीपूजन आहे. २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३६ नंतर गौरी विसर्जन करायचे आहे. १ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. पुढच्या वर्षी बाप्पाचे आगमन उशिरा म्हणजे १० सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे.

संबंधित पोस्ट