शिरसाठ भोसले सातगाव' या पुस्तकाचे लेखक आणि ऐतिहासिक वस्तूंचे संकलक बळवंत भोसले यांना देवाज्ञा

मुलुंड (शेखर भोसले) : खोपी गावचे सुपुत्र बळवंत विठोजीराव भोसले यांचे आज दि. २० ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने मीरा रोड येथील मुलीच्या घरी निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एस.टी.महामंडळाच्या परळ डेपोत कार्यरत असणारे बळवंत भोसले सातगावच्या अनेक मंडळींना सुपरिचित होते. शिवछत्रपतींच्या भोसले कुळाचा वारसदार म्हणून त्याना फार अभिमान होता. नोकरीतुन स्वेच्छा निवृत्ती घेऊन सातगाव भोसले यांचा मुळ इतिहास शोधण्याचा चंग बांधून अनेक स्थळांना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या, तेथील लोकांच्या मुलाखती, छायाचित्र यांचे संकलन केले, अनेक दस्ताऐवज जमा केले आणि सन २०१० साली, 'शिरसाठ भोसले सातगाव' या सुमारे २५० पानी पुस्तकाची त्यांनी निर्मिती केली. या पुस्तकाला सर्वच समाजातून चांगला प्रतिसाद मिळाला. पुढे समस्त भोसले परिवार एकत्र करण्यासाठी सातगाव भोसले कुळ नावाने मोबाईल व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमाद्वारे संघटना तयार केली. सातगावातील तमाम भोसले बंधूंना आपले विचार मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आपल्या भोसले कुळाचा खराखुरा इतिहास समाजाला ज्ञात करून देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान नेहमीच प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दात अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

संबंधित पोस्ट