
शहापुर - मुरबाड रस्त्याच्या दुर्दशा,ठेकेदार विरोधात नागरिकांची बैठक
- by Reporter
- Aug 21, 2020
- 1458 views
शहापूर (महेश धानके) : तालुक्यातून मुरबाड तालुक्याला जोडणाऱ्या मुख्यरस्त्याचे गेले तीन वर्षांपासून सुरु असलेले कॉंक्रीटीकरणाचे काम अजून पूर्णत्वास गेले नसल्याने या रस्त्याची र्दुदशा झाली आहे. हाच एकमेव दळणवळणाचा मुख्यरस्ता असल्याने तालुक्यातील सूमारे ४२ गावे आणि ८० वाड्यावस्त्यांमधील ग्रामस्थांना ये - जा करणे जिकरीचे बनले आहे. या मार्गावर सध्या अपघातग्रस्त परिस्थिती बनल्याने ऐन गणेशोत्सव काळात चिखल व खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यात शनिवारी गणपती आगमना दिवशी गणेश महाआरती आंदोलन करण्याचा इशारा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन काल शहापूर तहसीलदारांना देण्यात आले आहे.
शहापूर - मुरबाड या रस्त्याचे बांधकाम गेल्या ३ वर्षांपासून येथे सुरु आहे. रस्ते विकास महामंडळाने मंजूर केलेला हा रस्ता पुढे थेट रायगड जिल्ह्यातील खोपोलीपर्यंत जोडण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील गोठेघर ते दहिवली पर्यंत सुरु असलेल्या बांधकामाला ३ वर्षे उलटू लागली तरी आजपावेतो हे काम धीम्या गतीनेच सुरु आहे. त्यामुळे खड्डे, चिखल आणि उखडलेल्या रस्त्यावरुनच गावकऱ्यांना प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास धोकादायक बनला आहे. प्रसंगी सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे काही वाहनचालक कायमचे जायबंदी झाले असून अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे. तक्रारी करुनही रस्ते विकास महामंडळ व नियुक्त ठेकेदार उपाययोजना करीत नसल्याने तालुक्यातील संतप्त सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी शनिवारी रस्त्यातच गणेश महाआरती आंदोलन करण्याचे ठरविले आहे.
शहापूर तहसीलदारांना निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, भाजपाचे रामचंद्र जागरे, काशिनाथ भाकरे, तुकाराम भाकरे, मनसेचे तालुका अध्यक्ष जयवंत मांजे, काशिनाथ तिवरे, दत्तात्रेय पाटील, कमलाकर घरत, विनोद भोईर, अरुण मांजे, विनायक सापळे, दौलत पाटोळे, रवींद्र मडके, सुभाष पाटील, संदीप ठाकरे व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर