
कोरोनाच्याबाबतीत महाराष्ट्राने देशात दिशा दर्शक काम केले आहे - आरोग्यमंत्री राजेश टोपे
- by Reporter
- Aug 21, 2020
- 1133 views
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यात निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले की, सध्याच्या घडीला पुण्यात कोरोना रुग्णांसाठी बेडची अडचण नाही. परंतु, आम्ही ऑक्सिजन आणि आयसीयू बेडस वाढवण्यावर भर देत असल्याचे टोपे यांनी सांगितले.
याशिवाय, खासगी रुग्णालयांकडून लोकांना लुबाडले जाणार नाही, याचीही काळजी घेत असल्याचे टोपे यांनी म्हटले. कोरोनाच्याबाबतीत महाराष्ट्राने देशात दिशादर्शक काम केले आहे. खासगी रुग्णालयांमध्ये ८० टक्के बेडस् मिळावेत, यासाठी दोन अधिकारी नेमले आहेत. रुग्णांकडून जास्त पैसे आकारले जाणार नाही, यासाठी ऑडिटरची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सातत्याने या सगळ्याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, यावर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच पार्थ पवार हे माझे मित्र असून पवार कुटुंब हे आदर्शवत कुटुंब आहे. त्यांच्यातील सध्याचा विषय हा तात्पुरता विषय आहे. तो घरात बसून मिटवला जाऊ शकतो, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. पार्थ पवार हे वारंवार पक्षविरोधी भूमिका मांडत आहेत. यावर टोपे यांना पुण्यात पत्रकारांशी बोलताना भूमिका मांडली. पार्थ यांनी आजवर मांडलेल्या भूमिकेबाबत आपलं त्यांच्याशी बोलणं झाल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसेच राज्यातील विविध प्रश्नांवरही त्यांनी यावेळी भाष्य केलं.
सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, “आपला देश कायद्यावर चालतो. त्यामुळे आम्हाला कोर्टाच्या निर्णयाचा आदर असून महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणी चांगले काम केले आहे. आता हे प्रकरण कोर्टात आहे, त्यामुळे सरकार याबाबत सर्व सहकार्य करणार आहे.
रिपोर्टर