
मुंबईतील कोरोना परिस्थितीबाबत श्वेतपत्रिकेची भाजपाची मागणी- मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा
कोरोनाविषयक भ्रष्टाचाराची लोकप्रतिनिधींच्या समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी
- by Reporter
- Aug 19, 2020
- 610 views
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कोरोना परिस्थितीबाबत तातडीने श्वेतपत्रिका जारी करावी तसेच कोरोनाविषयक भ्रष्टाचाराची लोकप्रतिनिधींच्या समितीमार्फत चौकशी करावी अशा मागण्या आज मुंबई भाजपचे अध्यक्ष श्री.मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई मनपाचे आयुक्त श्री. इक्बालसिंह चहल यांच्याकडे केल्या. यावेळी खा.मनोज कोटक, भाजपा प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आणि भाजपा मनपा गटनेते प्रभाकर शिंदे उपस्थित होते. मुंबई भाजपाच्या शिष्टमंडळाने केलेल्या गैरप्रकारांच्या तक्रारींची गंभीर दाखल घेत या विषयावर सखोल चौकशी करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त श्री.चहल यांनी दिले आहे.
मुंबई भाजपच्या या शिष्टमंडळासोबत मनपा आयुक्तांची मुंबईतील कोरोना रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत गंभीर चर्चा झाली. कोरोना संदर्भातील भ्रष्टाचाराच्या तक्रारी यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने मांडल्या. मनपाची कोरोना केंद्रे आणि खाजगी कोरोना केअर सेंटर्स येथील प्रशासकीय घोळ तसेच भोजनाच्या दर्जाविषयी तक्रारी देखील या शिष्टमंडळाने आयुक्तांसामोर मांडल्या. या तक्रारींची दाखल घेत त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त श्री.चहल यांनी मुंबई भाजपाला दिले आहे.
यावेळी श्री.मंगलप्रभात लोढा यांनी खाजगी रुग्णालयांच्या अव्वाच्या सव्वा शुल्क वसुलीबाबतही मुद्दा उपस्थित केला. त्याबाबतही कारवाईचे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले आहे.
यावेळी मुंबई भाजपच्या शिष्टमंडळाने मुंबईतील कोरोना परिस्थितीचे आरोग्य लेखापरीक्षण (मेडिकल ऑडिट) करावे अशीही मागणी केली आहे.
रिपोर्टर